येत्या 8 वर्षांत चीनला मागे टाकत भारत होईल सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश: UN Report

ही आकडेवारी पाहता भारत या शतकाच्या अखेरीस जगातील सर्वात लोकसंख्या असलेला देश बनेल

प्रातिनिधिक प्रतिमा - Population (Photo Credits: PTI)

2027 पर्यंत भारताची लोकसंख्या (India Population) वाढून, भारत हा चीनलाही (China) मागे टाकेल असा अंदाज युनायटेड नेशन्स (UN) ने वर्तवला आहे. 2019 ते 2050 या कालावधीत भारताच्या सध्याच्या लोकसंख्येमध्ये तब्बल 273 मिलियनची वाढ होणार आहे. ही आकडेवारी पाहता भारत या शतकाच्या अखेरीस जगातील सर्वात लोकसंख्या असलेला देश बनेल. ‘द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स 2019: हायलाइट्स’ (The World Population Prospects 2019: Highlights) नावाचा अहवाल यूएन कडून सोमवारी प्रकाशित करण्यात आला. यामध्ये ही माहिती दिली आहे.

या अहवालानुसार पुढील 30 वर्षात म्हणजेच 2050 पर्यंत, जगाची लोकसंख्या सध्याच्या 7.7 अब्जावरून 9.7 अव्जावर पोहोचणार आहे. तर या शतकाच्या अखेरीस ती 11 अब्जापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. भारतासह नायजेरिया, पाकिस्तान, डेमोक्रेटिक रीपब्लिक ऑफ द कॉंगो, इथिओपिया, टांझानिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि अमेरिका या देशांच्या लोकसंख्येमध्ये कमालीची वाढ होणार आहे. (हेही वाचा: येत्या 40 वर्षांत भारत होईल सर्वाधील मुस्लीम लोकसंख्या असलेला देश; पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर)

2011 च्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या 1.21 अब्ज इतकी आहे, तर चीनची लोकसंख्या 1.38 अब्ज इतकी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला येत्या आठ वर्षात मागे टाकेल असा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. 2010 ते 2019 या कालावधीमध्ये भारताच्या लोकसंख्येमध्ये 1.2 टक्के वार्षिक दराने वाढ झाली आहे. हा दर चीनच्या लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा दुप्पट असल्याचे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (United Nations Population Fund) च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.