India-Nepal Tourist Train: भारत आणि नेपाळ पर्यटन ट्रेनद्वारे जोडले जाणार; 21 जूनपासून IRCTC सुरु करत आहे श्री रामायण यात्रा

धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी, आधुनिक सुविधांसह पहिली वातानुकूलित भारत गौरव ट्रेन, श्री रामायण यात्रा भारत आणि नेपाळमधील भगवान रामाशी संबंधित ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे दाखवेल

Indian Railways | Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) ‘भारत गौरव योजने’अंतर्गत दोन देशांना पर्यटन ट्रेनद्वारे जोडणारी आयआरसीटीसी (IRCTC) ही देशातील पहिली एजन्सी असेल. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, भारत (India) आणि नेपाळ (Nepal) दरम्यानची ही पर्यटन ट्रेन 21 जून रोजी नवी दिल्ली येथून श्री रामायण यात्रा प्रवासासाठी निघेल. सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून सुटणारी ही पर्यटक ट्रेन श्री रामायण यात्रेमध्ये भारत आणि नेपाळ दरम्यान सुमारे 8,000 किमी अंतर कापेल.

धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी, आधुनिक सुविधांसह पहिली वातानुकूलित भारत गौरव ट्रेन, श्री रामायण यात्रा भारत आणि नेपाळमधील भगवान रामाशी संबंधित ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे दाखवेल. ही ट्रेन 'स्वदेश दर्शन' योजनेंतर्गत चालवली जाईल. ही ट्रेन नेपाळमधील जनकपूर शहरातील राम जानकी मंदिरापर्यंतही जाणार आहे. दोन देशांच्या पर्यटन स्थळांची ‘पर्यटन ट्रेन’मधून प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

IRCTC नुसार, 600 लोक क्षमतेची ट्रेन अयोध्या, बक्सर, जनकपूर, सीतामढी, काशी, प्रयाग, चित्रकूट, नाशिक, हम्पी, रामेश्वरम, कांचीपुरम आणि भद्राचलम या प्रमुख ठिकाणांहून जाईल. ही ट्रेन जनकपूरमधील 4 ठिकाणे कव्हर करेल. यामध्ये जानकी मंदिर, सीता मंदिर, भगवान रामाचे लग्नाचे ठिकाण (जिथे रामाची वरात थांबली होती) आणि धनुषधाम (जिथे भगवान रामाने सीतेच्या लग्नासाठी शिवाचे धनुष्य तोडले होते) यांचा समावेश असेल.

केंद्र सरकारच्या पुढाकाराने धावणाऱ्या या ट्रेनचे नाव 'देखो अपना देश' असे आहे. देशांतर्गत पर्यटनाला चालना देणे हा त्याचा उद्देश आहे. भारत गौरव पर्यटक रेल्वे प्रवासाचा पहिला थांबा भगवान रामाचे जन्मस्थान अयोध्या असेल. श्री रामजन्मभूमी मंदिर आणि हनुमान मंदिराव्यतिरिक्त पर्यटकांना येथील नंदीग्राममधील भारत मंदिरालाही भेट देता येईल. या यात्रेमधील सर्व प्रवाशांना आयआरसीटीसीकडून फेस मास्क, हँड ग्लोव्हज आणि हँड सॅनिटायझर असलेले सेफ्टी किट दिले जाईल. (हेही वाचा: रेल्वे प्रवाशांना त्यांच्या डेस्टिनेशन स्टेशन पूर्वी 'अलर्ट' करणारी रेल्वेची सेवा नेमकी सेट कशी करायची?)

या प्रवासाच्या खर्चाबद्दल सांगायचे तर, दोन्ही देशांमधील भगवान रामाशी संबंधित असलेल्या ठिकाणांना भेटी देण्यासाठी प्रति व्यक्ती साधारण 65,000 रुपये खर्च येईल. या यात्रेत उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांचा समावेश असेल.