India-China Standoff: Zomato कर्मचाऱ्यांच चीनविरुद्ध अनोखं निषेध, टी-शर्ट जाळून दिला राजीनामा, पाहा Video

या कर्मचाऱ्यांनी भारत-चीनमधील लडाख सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.

झोमॅटो कर्मचाऱ्यांचा विरोध (Photo Credit: Twitter)

पश्चिम बंगालमध्ये चीनविरूद्ध (China) लोकांचा संताप रस्त्यावर पाहायला मिळत आहे. भारतीय कंपन्यांमधील चिनी गुंतवणूकीवर संतापून कोलकाता (Kolkata) येथील झोमाटो (Zomato) फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या कर्मचार्‍यांच्या एका गटाने फर्ममधील चिनी गुंतवणूकीचा निषेध करण्यासाठी त्यांचे अधिकृत टी-शर्ट जाळले आणि राजीनामा दिला. या कर्मचाऱ्यांनी भारत (India)-चीनमधील (China) लडाख सीमेवर (Ladakh Border) सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. लडाखमध्ये भारत-चीन सीमेवरील तणाव कमी होण्याचं नाव घेत नाही. त्यातच चीन वेगवेगळ्या खेळी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर चीनच्या निषेधार्थ देशभरात #BoycottChinaproduct ही मोहीमही राबवली जात आहे. याच्या अंतर्गत कोलकातामध्ये झोमॅटोच्या तब्बल 150 डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी आपले टी-शर्ट जाळून सामूहिक राजीनामा दिला आहे. (India-China Border Tensions: राष्ट्राची रक्षा आणि सुरक्षिततेबाबत कधी बोलणार? राहुल गांधी यांनी ट्वीट करत पुन्हा मोदी सरकारवर साधला निशाणा)

इतकच नाही तर झोमाटोच्या माध्यमातून लोकांना ऑर्डर देऊ नये असेही आवाहन त्यांनी केले. 2018 मध्ये चिनी कंपनी अलिबाबाशी संबंधित असलेल्या अँट फायनान्शियने 21 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करुन जोमाटोमध्ये 14.7 टक्के शेअर्स खरेदी केले आहे. झोमाटोने नुकताच अँट फायनान्शियलकडून 150 कोटी डॉलरची राशी मिळवली आहे. निदर्शनात सहभागी असलेल्या एका व्यक्तीने म्हटले की, “चिनी कंपन्या येथून नफा कमवत आहेत आणि आमच्या सैनिकांवर हल्ला करीत आहेत. त्यांना आमची जमीन हडप करायची आहे. हे होऊ देऊ शकत नाही. आम्ही आणि आमचे कुटुंबीय भुकेले राहू, पण चीनने ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे अशा कोणत्याही कंपनीत आम्ही काम करणार नाही."

दरम्यान, मे महिन्यात झोमाटोने कोविड-19 मुळे त्यांच्या 13 टक्के कर्मचार्‍यांना, 520 लोकांना नोकरीतून काढून टाकले होते. यासंदर्भात झोमाटोकडून त्वरित प्रतिसाद मिळालेला नाही. यापूर्वी, शनिवारी कोलकाताच्या बेहला भागात 100 हून अधिक डिलिव्हरी बोयसने झोमॅटोमधून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.  यामध्ये असे बरेच जण आहेत ज्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह त्यांच्या नोकरीवर अवलंबून आहे परंतु हे लोकं देश आणि सैन्यासाठी उपासमारी सहन करण्यासही तयार आहेत. दुसरीकडे, 15 जून रोजी भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते, ज्यानंतर झालेल्या शांततापुर्ण कराराला चीनने बगल देत डेपसांगमध्ये आपलं सैन्य वाढवलं आहे.