सणासुदीच्या काळात ख्रिसमसपर्यंत धावणार 200 जादा गाड्या; पहिल्यांदा उपलब्ध होणार 'या' सुविधा- रेल्वेचा निर्णय

या गोष्टींचा विचार करत रेल्वेने या विशेष गाड्यांची सोय केली आहे. शुक्रवारी रेल्वेने दिलेल्या निवेदनानुसार, सामान्य गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे लावून रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्नही करीत आहे

भारतीय रेल्वे (संग्रहित संपादित प्रतिमा)

सणांच्या निमित्ताने प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता, ख्रिसमसपर्यंत रेल्वेने (Indian Railway) 200 जोड्या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने दुर्गापूजापासूनच रेल्वेच्या या उपक्रमाला सुरुवात केली आहे. आता दिवाळी, छठ असे सण आहेत, त्यामुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या गोष्टींचा विचार करत रेल्वेने या विशेष गाड्यांची सोय केली आहे. शुक्रवारी रेल्वेने दिलेल्या निवेदनानुसार, सामान्य गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे लावून रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्नही करीत आहे. अशा प्रकारे रेल्वे प्रवाशांना सुमारे 2500 फेऱ्या अतिरिक्त सेवा पुरवेल.

देशातील दिल्ली-पाटणा, दिल्ली-कोलकाता, दिल्ली-मुंबई, मुंबई-लखनऊ, चंदीगड-गोरखपूर, दिल्ली-छपरा, हावडा-कटिहार, हरिद्वार-जबलपूर इत्यादी प्रमुख ठिकाणांना जोडण्यासाठी रेल्वेने विशेष गाड्यांची योजना आखली आहे. सोबत रेल्वेने काही सुविधा पुरवण्याचाही निर्णय घेतला आहे.

शिस्तबद्ध पद्धतीने आरक्षित कोचमध्ये प्रवाशांना प्रवेश देण्यासाठी, आरपीएफ कर्मचारी स्थानकांवरील गर्दीवर नियंत्रण ठेवतील. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आरपीएफचे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षा, अभियांत्रिकी, सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन विभागांव्यतिरिक्त, गर्दीच्या रेल्वे विभागात महत्त्वपूर्ण रेल्वे क्रॉसिंगवर कर्मचारी तैनात आहेत.

गाड्या सुरळीत चालविण्यासाठी प्रमुख रेल्वे स्थानकांवर अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म नंबर असलेल्या गाड्यांचे आगमन / प्रस्थान वेळ जाहीर करण्यासाठी देखील उपाययोजना केल्या आहेत. (हेही वाचा: खुशखबर! लांब पल्ल्यांच्या ट्रेनमध्ये मिळणार मोफत WiFi सेवा; रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची माहिती)

गरज भासल्यास मोठ्या स्टेशनवर डॉक्टरांच्या टीम उपलब्ध असतील. सेमी-डॉक्टरांसमवेत रुग्णवाहिका उपलब्ध असतील. प्रत्येक स्थानकावर विशेष मदत केंद्र असेल. मेल / एक्स्प्रेस / पॅसेंजर गाड्या निर्धारित वेळेवर सोडण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार - जसे की सीट विकणे, ओव्हर चार्जिंग आणि दलाली इ.  गोष्टींवर सुरक्षा व दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बारीक लक्ष ठेवले जाईल.