Aadhaar Card for Kids: 5 वर्षांखालील मुलांचे आधार कार्ड कसे काढाल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स
महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक असे आधार कार्ड लहान मुलांसाठी देखील आवश्यक आहे. 5 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी निळ्या रंगाचे आधार कार्ड मिळते. याला 'बाल आधार कार्ड' असे म्हणतात.
प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) अत्यंत गरजेचे आहे. महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक असे आधार कार्ड लहान मुलांसाठी देखील आवश्यक आहे. 5 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी निळ्या रंगाचे आधार कार्ड मिळते. याला 'बाल आधार कार्ड' असे म्हणतात. हे आधार कार्ड काढताना लहान मुलांचे बायोमेट्रीक घेतले जात नाही. मात्र मुलं 5 वर्षाचे झाल्यानंतर यामध्ये बायोमेट्रीक अपडेट करणे गरजेचे आहे. अन्यथा हे कार्ड अवैध मानले जाईल. (Aadhaar Card अपडेट करण्यासाठी 'ही' कागदपत्रं आवश्यक; पहा संपूर्ण यादी)
युडीआयने दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांचे आधार कार्ड काढताना त्यांचा फोटो काढला जातो आणि मुलाच्या पालकांच्या आधार कार्डची माहिती घेतली जाते. ही प्रक्रीया करताना मुलांचे फिंगरप्रिंट किंवा आय स्कॅन केले जात नाही. मुलं 5 वर्षांची झाल्यानंतर त्यांच्या 10 ही बोटांचे आणि डोळ्याचे बायोमेट्रीक गरजेचे आहे. तर जाणून घेऊना लहान मुलांचे आधार कार्ड काढण्याची प्रक्रीया...
आधार कार्ड अपॉयमेंट:
# युआयडीएआय (UIDAI) च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
# आधार रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.
# मुलाचे नाव, आई-वडीलांचा मोबाईल आणि ई-मेल आयडी भरा.
# वरील माहिती भरल्यानंतर अपॉयमेंट फिक्सवर क्लिक करा.
आधार कार्ड अप्लाय:
# तुमच्या जवळच्या आधार एनरोलमेंट सेंटरला भेट द्या.
# सर्व गरजेचे कागदपत्रं सोबत बाळगा.
# मुलाचा फोटो आणि आई-वडीलांचे आधार डिटेल्स सिस्टममध्ये लिंक केले जातील.
# यानंतर काही दिवसांत मुलाचे आधार कार्ड पोस्टाने घरी येईल.
आधार कार्ड कागदपत्रं:
लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी खालील कागदपत्रं आवश्यक आहेत.
# मुला/मुलीचा जन्मदाखला किंवा शाळेचे ओळखपत्रं.
# आई किंवा वडीलांचे आधार कार्ड.
लहान मुलांचे शाळेतील अॅडमिशनसाठी आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या लहान मुलांसाठी ब्लू आधार कार्ड या सोप्या पद्धतीने नक्की काढून घ्या आणि जर तुमच्या मुला/मुलीला 5 वर्ष पूर्ण झाली असतील तर आधार कार्डवर त्यांचे बायोमेट्रीक डिटेल्स नक्की अपडेट करा.