How to Apply For Minor's PAN Card: आता तुमच्या अल्पवयीन मुलांचेही बनवू शकता पॅन कार्ड; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
जर का तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलांसाठी बँकेत खाते उघडत असाल किंवा त्यांच्या नावावर गुंतवणूक करण्यासाठी त्यांना नॉमिनी बनवायचे असेल, तर मुलांकडे त्यांचे पॅन कार्ड (PAN Card) आवश्यक असेल. परंतु याबाबत काळजी करण्याची गरज नाही, कारण आता अल्पवयीन व्यक्तीचेही पॅनकार्ड सहज बनवता येणार आहे. ते बनवायलाही जास्त वेळ लागत नाही. मुलाचे पालक आपल्या अल्पवयीन मुलाच्या वतीने पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात. आयकर विभागाने पॅन कार्ड मिळवण्यासाठी किमान वयाची अट निश्चित केलेली नाही.
अल्पवयीन व्यक्तीच्या पॅनमध्ये त्याची स्वाक्षरी आणि छायाचित्र नसते आणि ओळख म्हणून ते वापरता येत नाही. अहवालानुसार, अल्पवयीन व्यक्तीला 18 वर्षांचे झाल्यानंतर पॅन कार्ड अपडेटसाठी अर्ज सादर करावा लागतो.
अल्पवयीन मुलाच्या पॅन कार्डसाठी असा करा अर्ज-
- NSDL च्या अधिकृत ऑनलाइन पॅन अर्ज पोर्टलवर जा.
- तिथे फॉर्म 49A भरण्यासाठी आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि अल्पवयीन मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि पालकांच्या स्वाक्षऱ्या अपलोड करा.
- त्यानंतर 107 रुपयांचे पेमेंट केल्यानंतर सबमिट करण्यासाठी क्लिक करा.
- तुम्हाला अर्जाची स्थिती तपासण्यासाठी एक पावती क्रमांक दिला जाईल.
- यशस्वी पडताळणीनंतर, पॅन कार्ड 15 दिवसांच्या आत वितरित केले जाईल.
अर्ज दाखल करताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये पत्त्याचा पुरावा आणि पालकाचा ओळखीचा पुरावा असू शकतो. (हेही वाचा: आता समान ओळखपत्र म्हणून होणार PAN Card चा वापर; जाणून घ्या काय आहे Nirmala Sitharaman यांचा पॅनकार्डधारकांसाठी प्रस्ताव)
दरम्यान, जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुम्ही आयटीआर क्लेम करू शकत नाही. जर पालकांना मुलाच्या नावावर गुंतवणूक करायची असेल, जर गुंतवणुकीसाठी अल्पवयीन मुलाला नॉमिनी करायचे असते, जर का अल्पवयीन मुलाच्या नावाने बँक खाते उघडायचे किंवा जर अल्पवयीन मुलगा काम करत असेल तर त्याला पॅन कार्डची गरज भासू शकते.