HDFC Bank लघू आणि मध्यम व्यापाऱ्यांना Digital Transactions वर देणार कॅशबॅक; जाणून घ्या, कसा घ्याल या ऑफरचा लाभ?

डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी एचडीएफसी बँकेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे लघु आणि मध्यम उद्योजक व्यवहारासाठी डिजिटल माध्यमांचा स्वीकार करण्यास प्रवृत्त होतील.

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

छोट्या आणि मध्यम स्वरुपाचा व्यवसाय असणाऱ्या व्यापाऱ्यांना एचडीएफसी बँकेकडून (HDFC Bank) कॅशबॅक (Cashback) देण्यात येणार आहे. कॅशबॅकची ही संधी सर्वच म्हणजे शहरं, निम शहरी आणि ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांना मिळणार आहे. डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी एचडीएफसी बँकेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे लघु आणि मध्यम व्यापारी व्यवहारासाठी डिजिटल माध्यमांचा स्वीकार करण्यास प्रवृत्त होतील. या ऑफरद्वारे व्यापाऱ्यांना निश्चित कॅशबॅक आणि गिफ्ट देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी एचडीएफसी बँकेच्या स्मार्ट हब, मर्चंट अॅपमधून कमीत कमी 30 डिजिटल ट्रान्जॅक्शन करणे आवश्यक आहे. (कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी HDFC Group कडून PM Cares Fund साठी 150 कोटींचे योगदान)

"एचडीएफसी बँकेचे मर्चंट अॅप, क्युआर कोड, पीओएस किंवा पेमेंट गेटवेज या माध्यमातून डिजिटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना कॅशबॅक मिळणार आहे, एचडीएफसी बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच फेस्टिव्ह सीजन कॅम्पेन वाढवत देशभरात छोट्या आणि मोठ्या व्यापाऱ्यांना आम्ही कॅशबॅक देणार आहोत. एचडीएफसी बँकेचा हा प्रोग्रॅम फक्त शहरातील व्यापाऱ्यांसाठी नसून ग्रामीण आणि निमशहरी भागातील व्यापाऱ्यांसाठी देखील आहे," अशी माहिती एचडीएफसीच्या पेमेंट, क्नज्युमर फायनान्स आणि डिजिटल बँकींगचे हेड पराग राव यांनी पीटीआयला दिली.

देशभरातील व्यापाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या डिजिटल पेमेंट्सचा प्रसार करण्यात येत आहे. व्यापाऱ्यांमध्ये डिजिटल व्यवहारासाठी योग्य ते साधन असणे आणि ते वापरण्यासाठी योग्य ती माहिती असणे गरजेचे आहे. सर्व व्यापाऱ्यांमध्ये डिजिटल पेमेंट सुरळीत झाल्यास डिजिटल इंडियाच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचे पाऊल ठरेल. छोटे आणि मध्यम व्यापारी हे व्यापार क्षेत्रातील महत्त्वाचा घटक आहेत. जर या व्यापाऱ्यांनी डिजिटल पेमेंट सुरु केल्यास ग्राहकांनासुद्धा इलेक्ट्रॉनिक पेमेंटद्वारे सोयीस्कर पेमेंट करता येईल. असेही त्यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांना सोयीस्कररीत्या पेमेंट स्वीकारता यावे, यासाठी बँकेकडून वेगवेगळ्या मार्गांनी विचार केला जात आहे. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांसाठी एखादी वेबसाईट बनवणे त्यांच्या होणाऱ्या व्यवहारांची नोंद ठेवणे यांसारख्या सुविधांवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. डेबिट कार्ड आणि युपीआय द्वारे होणाऱ्या पेमेंट मध्ये 48% डिजिटल ट्रान्जॅक्शन हे एचडीएफसी बँकेतर्फे होते.

लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांमध्ये डिजिटल व्यवहारांना चालना देणे ही केवळ एक सुरुवात आहे. अशाप्रकारे डिजिटल व्यवहाराचे जाळे संपूर्ण देशभरात पसवण्याचा आमचा मानस असल्याचेही राव यांनी सांगितले.