PM Kisan eKYC करताना अडचण? पोर्टलवर पर्याय नसल्यास हे तीन मार्ग वापरा

पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर ई-केवायसीचा पर्याय दिसत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना अडचण येत आहे. ही प्रक्रिया सीएससी केंद्र, मोबाइल अ‍ॅप आणि राज्य सरकारच्या अधिकृत लॉगिनद्वारे पूर्ण करता येते. ई-केवायसीच्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

PM Kisan Yojana | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेच्या अधिकृत पोर्टलवर (pmkisan.gov.in) ई-केवायसीचा पर्याय दिसत नसल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र ही प्रक्रिया पोर्टलशिवायही तीन मार्गांनी पूर्ण करता येते. हे मार्ग म्हणजे गावातील सीएससी केंद्र, पीएम किसान मोबाइल अ‍ॅप आणि राज्य सरकारचे अधिकृत लॉगिन.

फसवणुकीपासून सावध राहा

ई-केवायसी करण्यासाठी गावात कोणी येऊन पैसे मागत असेल, तर ती फसवणूक असू शकते. त्यामुळे संबंधित व्यक्तीची ओळख आणि अधिकृतता आधी तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आधार क्रमांक, ओटीपी किंवा एमपिन कोणालाही सांगू नये.

पर्याय १: सीएससी केंद्रावर जा

पोर्टलवर ई-केवायसीचा पर्याय नसला, तरी गावातील नोंदणीकृत सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) चालकाच्या लॉगिनद्वारे हे काम करता येते.

शेतकऱ्याने आधार कार्ड आणि पीएम किसान नोंदणी क्रमांक सोबत न्यावा.

केंद्रचालक बायोमेट्रिक पडताळणी करून ई-केवायसी पूर्ण करतात.

यासाठी ठरलेले शुल्कच द्यावे. त्यापेक्षा जास्त पैसे देऊ नयेत.

पर्याय २: मोबाइल अ‍ॅपवरून घरबसल्या

शेतकरी मोबाइलवरील पीएम किसान अ‍ॅपद्वारेही ई-केवायसी करू शकतात. त्यासाठी प्ले स्टोअरवरून पीएम किसान अ‍ॅप आणि आधार फेस आरडी अ‍ॅप हे दोन्ही डाउनलोड करावेत.

पीएम किसान अ‍ॅप उघडा, "Next" वर क्लिक करा आणि भाषा निवडा.

"Login" वर क्लिक करून लॉगिन प्रकार म्हणून "Beneficiary" निवडा.

आधार क्रमांक किंवा पीएम किसान नोंदणी क्रमांक टाका.

आधार क्रमांक टाकताच "Facial eKYC" चा पर्याय दिसेल.

संमती अर्जावर टिक करून चेहरा स्कॅन करा.

वर्तुळात चेहरा आणा आणि वर्तुळाच्या रेषा हिरव्या होऊ द्या.

त्यानंतर स्वतःचा एमपिन तयार करा.

पीएम किसानच्या डॅशबोर्डवर जा. "eKYC Status" समोर "Yes" दिसल्यास ई-केवायसी पूर्ण झाली आहे.

चेहरा स्कॅन करताना पुरेसा उजेड असावा. कॅमेऱ्याची काच स्वच्छ करावी आणि चष्मा किंवा मास्क काढावा, अशी सूचना देण्यात आली आहे.

पर्याय ३: राज्य सरकारचे अधिकृत लॉगिन

तिसरा पर्याय म्हणजे राज्य सरकारने जारी केलेले अधिकृत लॉगिन आयडी. तुमच्या परिसरात असे अधिकृत लॉगिन असलेली व्यक्ती असल्यास ती लॉगिन करून तुमची ई-केवायसी करू शकते.

माहिती तपासून घ्या

काही संकेतस्थळांवर पोर्टलवर आधार ओटीपीद्वारे ई-केवायसी करता येत असल्याचे नमूद आहे. पोर्टलवरील उपलब्ध पर्याय वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे सर्वात आधी pmkisan.gov.in वरील "Farmers Corner" मध्ये पर्याय उपलब्ध आहे का, ते पाहावे. नसेल तरच वरील तीन मार्ग वापरावेत. ई-केवायसीची सद्यःस्थिती पाहण्यासाठी पोर्टलवरील "Know Your Status" हा पर्याय वापरता येतो.

पीएम किसान योजनेत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला 6000 रुपये मिळतात. ही रक्कम प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांत थेट बँक खात्यात जमा होते. आधारद्वारे शेतकऱ्याची ओळख निश्चित करण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. ती प्रलंबित असल्यास हप्ता थांबू शकतो. ई-केवायसीबाबत अडचण असल्यास पीएम किसान हेल्पलाइन 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) वर संपर्क साधता येतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement