31 मार्चपूर्वी खरेदी करा 'या' इलेक्ट्रॉनिक वस्तू; 1 एप्रिलपासून होणार किंमतीत वाढ
येत्या 1 एप्रिलपासून या सर्व वस्तूंची किंमत वाढणार आहे.
मार्च महिना लागला की सर्वांनाचं उन्हाळ्याची चाहुल लागते. परिणामी या हंगामात वातानुकूलीत वस्तूंची मागणी वाढते. जर आपण पंखा, फ्रीज, कूलर किंवा एसी आदी इलेक्ट्रिकल वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या 1 एप्रिलपासून या सर्व वस्तूंची किंमत वाढणार आहे. त्यामुळे आपण 31 मार्चपूर्वी या वस्तूंची कमी किंमतीत खरेदी करू शकता. खरं तर, मार्केटमधून ज्या प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत, त्यानुसार पुढच्या महिन्याच्या सुरूवातीस महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.
एयर कंडीशन वस्तूच्या किंमत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता -
जर आपण एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ताबडतोब खरेदी करा. कारण एसीची किंमत 2000 रुपयांपर्यंत वाढू शकते. वास्तविक, खर्च वाढल्यामुळे किंमत 4 ते 6 टक्क्यांनी वाढविली जाऊ शकते. इलेक्ट्रिक उपकरणे बनवणाऱ्या कंपन्या सतत किंमतीपेक्षा जास्त पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. या वस्तू बनवण्यासाठी लागणाऱ्या पॉलिमर्स, कॉपर, स्टील, पॅकेजिंग मटेरियलची किंमत सध्या वाढली आहे. त्यामुळे कंपन्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तांब्याच्या किमतींमध्ये विक्रमी उच्चांक दिसून आला आहे. या सर्व कारणांमुळे इलेक्ट्रिक घरगुती उपकरणे महाग होणार आहेत. याशिवाय कूलरची किंमतही 1000 रुपयांनी वाढू शकते. (वाचा - 31 मार्च अगोदर पूर्ण करा 'हे' 7 काम; 1 एप्रिलपासून करावा लागणार नाही कोणत्याही अडथळ्याचा सामना)
फॅनची किंमत वाढण्याची शक्यता -
सर्वसाधारणपणे, प्रत्येक घरात वापरण्यात येणाऱ्या फॅनची म्हणजेच पंख्याची किंमतदेखील वाढण्याची शक्यता आहे. तांबे महाग झाल्यामुळे पंखे बनविण्यासाठी उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी पंख्यांच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे आता कंपन्या येत्या काही दिवसांमध्ये पंख्याची किंमत वाढवू शकतात.
दरम्यान, कोरोना साथीच्या आजारामुळे आलेल्या आर्थिक मंदीमुळे किंमतींमध्ये वाढ झाली आहे. आर्थिक अडचणींमुळे गेल्या काही दिवसांपासून लोकांनी वस्तू खरेदी केल्या नाहीत. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. आता बाजारात तेजी आली असल्याने त्याचा परिणाम पुढील काही दिवसांत पाहायला मिळणार आहे.