व्हीव्हीपॅटच्या 50 टक्के स्लीपची मोजणी करावी; शरद पवार, चंद्राबाबू नायडू यांच्यासह 23 विरोधी पक्षांनी केली मागणी
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांची पत्रकार परिषद आज मुंबई येथे पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये ही मागणी करण्यात आली.
मतमोजणीमध्ये पारदर्शक यावी म्हणून ईव्हीएम (EVM) मशीनची सुरुवात झाली, मात्र मागच्या निवडणुकीवेळी या यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचे आरोप झाले होते. असा प्रकार या निवडणुकीवेळी होऊ नये म्हणून व्हीव्हीपॅट (VVPAT) स्लीपची पडताळणी करावी लागणार आहे. मात्र 50 टक्के स्लीपची पडताळणी करण्यात यावी अशी मागणी 23 विरोधी पक्षांनी केली आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांची पत्रकार परिषद आज मुंबई येथे पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये ही मागणी करण्यात आली.
‘Save The Nation, Save Democracy’ या विषयावर चंद्राबाबू नायडू यांचे भाषण झाले. यामध्ये त्यांनी ईव्हीएम मशीनबाबत त्यांचे विचार व्यक्त केले. ‘व्हिव्हिपॅटसाठी 9 हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. मात्र अजूनही कर्मचारी याबाबत तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाहीत. शिवाय ईव्हीएम मशीनचे ऑडिट करणारे कुणीही तज्ज्ञ नाही. व्हीव्हीपॅट स्लीप बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा वेळ लागत आहे, असे का? हे मशीन असल्याने त्यात अनेक फेरफार केले जाऊ शकतात, जे मागच्या निवडणुकावेळी झाले होते. त्यामुळे आम्ही ईव्हीएमच्या विरोधात आहोत.’ असे चंद्राबाबू नायडू म्हणाले. (हेही वाचा: EVM-VVPT वरुन विरोधी पक्ष पुन्हा सर्वोच्च न्यायालयात घेणार धाव)
या पत्रकार परिषदेसाठी देशातील महत्वाचे नेते उपस्थित होते. यामध्ये शरद पवार, चंद्राबाबू नायडू, सुशीलकुमार शिंदे, खोरुम ओमर, प्रकाश रेड्डी, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल ही काही महत्वाची नावे आहेत. दरम्यान आतापर्यंत निवडणूक आयोगाकडून 4125 ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मोजणी केली जात होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 20,625 ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मोजणी केली जाणार आहे.