Crude Oil Price: कच्चा तेलाच्या किंमतीत प्रति बॅरल 2.1 डॉलरची वाढ; भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती वाढल्याने सौदी अरेबियाने हा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे भारतालाही मोठा झटका बसला आहे. याचा सर्वाधिक फटका भारताला बसणार आहे.

Crude Oil (Photo Credits: AFP)

Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींवरून जगभरात गोंधळ सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचे भाव गगनाला भिडले. हे युद्ध सुरू झाल्यानंतरच कच्च्या तेलाची किंमत 139 अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचली होती. मात्र, आता त्यात काहीशी नरमाई आली आहे. तथापि, ते अजूनही उच्च पातळीवर आहे. दरम्यान, सौदी अरेबियाने उचललेल्या या पाऊलामुळे आशियाई देशांच्या अडचणी वाढल्या आहेत. जगातील सर्वात मोठ्या तेल निर्यातदार देशाने आशियाई देशांसाठी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ केली आहे.

जुलै महिन्यासाठी, आशियाई देशांसाठी अरब लाइट क्रूड ऑइलची अधिकृत विक्री किंमत (OSP) जूनच्या तुलनेत प्रति बॅरल $ 2.1 ने वाढली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती वाढल्याने सौदी अरेबियाने हा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे भारतालाही मोठा झटका बसला आहे. याचा सर्वाधिक फटका भारताला बसणार आहे. कारण, भारत सौदी अरेबियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. (हेही वाचा - RBI Monetary Policy: रेपो रेट 50 bps ने वाढून 4.90%; EMI महागण्याची शक्यता)

तज्ञांनी आधीच सौदी अरेबियाच्या या निर्णयाचा अंदाज वर्तवला होता. परंतु, त्यांना कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे $ 1.5 ची वाढ अपेक्षित होती. मात्र, सध्या जी वाढ करण्यात आली आहे, ती यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.

जगातील सर्वात मोठी तेल कंपनी सौदी अरामकोने जुलैमध्ये तेलाचे उत्पादन दररोज 648,000 बॅरलने वाढवण्याचा ओपेक प्लस देशांमधील करार असतानाही हा निर्णय घेतला आहे. यामुळे आशियाई देशांच्या समस्या वाढल्या आहेत. आशियाई देशांसाठी कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा सर्वात जास्त परिणाम भारत आणि चीनवर होणार आहे. भारत आणि चीन सतत रशियन तेल खरेदी करत आहेत. सौदी अरेबियाने रविवारी रात्री कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ केली. मात्र, अमेरिकेसाठी कच्च्या तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

पेट्रोल- डिझेल महागण्याची शक्यता -

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचा थेट परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होणार आहे. सरकारच्या उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशातील तेलाच्या किमती स्थिर आहेत. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने तेल कंपन्यांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे. परिणामी, भारतात पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.