हृदयद्रावक! गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात नराधमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून धडापासून वेगळं केलं शीर

दांतीवाडा पोलिसांना अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षांच्या मुलीवर प्रथम बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: ANI)

गुजरातमधील (Gujarat) बनासकांठा जिल्ह्यातून (Banaskantha District) अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. दांतीवाडा पोलिसांना अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षांच्या मुलीवर प्रथम बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. सध्या पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. पकडलेला आरोपी हा मुलीचा नातेवाईक आहे. आरोपी शुक्रवारी अल्पवयीन मुलीला दुचाकीवर घेऊन गेला होता.

या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर आधी बलात्कार केला आणि त्यानंतर तिचं शीर धडापासून वेगळं करून हत्या केली. बनासकांठा येथील डीसा येथून शुक्रवारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. त्यानंतर शनिवारी दांतीवाडा पोलिसांनी मुलीच्या डोकं धडापासून वेगळं झालेला मृतदेह ताब्यात घेतला. पोलिस अधीक्षकांनी मुलीवर बलात्काराची घटना घडल्याची पुष्टी केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (हेही वाचा -  Honour Killing: आंतरजातीय प्रेमसंबंधांतून पोटच्या मुलीची हत्या करून मृतदेह पुरला शेतात; वडिलांसह दोन चुलत भावांना अटक)

या घटनेसंदर्भात गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर म्हटलं आहे की, 'गुजरातमध्ये भारत मातेचा गळा कापला. आम्ही वारंवार असे म्हणत होतो की, पंतप्रधान मोदींनी हाथरस प्रकरणावर काहीतरी बोलावे पण, त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आता गुजरातच्या दांतीवाड्यात 12 वर्षाच्या निरागस मुलीचा गळा कापला. हा कोणता विकास आहे?'

उत्तर प्रदेशातील हाथरसमधील बलात्काराच्या घटनेला लज्जास्पद म्हणत जिग्नेश मेवाणी यांनी विरोधी पक्ष आणि दलित संघटनांकडून गेल्या महिन्यात भारत बंदचे आव्हान केले होते. हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर जिग्नेश मेवाणी यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.