पंजाबमध्ये सरकार स्थापन झाल्यास महिलेला महिन्याला 1,000 रुपये देऊ, अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा
हा आतापर्यंतचा सर्वात मोठा महिला सक्षमीकरण कार्यक्रम असेल, असे त्यांनी म्हटले आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब (Punjab) विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Assembly Election) सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. सत्तेची चावी मिळविण्यासाठी नेतेमंडळी जनतेची मने जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जर पंजाबमध्ये त्यांच्या पक्षाने सरकार स्थापन केले तर 18 वर्षांवरील प्रत्येक महिलेला दरमहा 1000 रुपये देऊ, असे त्यांनी म्हटले आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा महिला सक्षमीकरण कार्यक्रम असेल, असे त्यांनी म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांनी मोगा येथे सांगितले की, "जर आम्ही 2022 मध्ये पंजाबमध्ये सरकार बनवले तर आम्ही राज्यातील 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक महिलेला दरमहा 1000 रुपये देऊ. एका कुटुंबात 3 महिला सदस्य असल्यास प्रत्येकाला 1000 रुपये मिळतील.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवसांच्या पंजाब दौऱ्यावर आहेत
अरविंद केजरीवाल सध्या पंजाबच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा पहिला दिवस असून त्यामध्ये त्यांनी त्यांच्या 'मिशन पंजाब'ची सुरुवात मोगा येथून केली आहे. 'मिशन पंजाब' अंतर्गत ते येत्या एक महिन्यात राज्यातील अनेक ठिकाणी भेटी देतील आणि आम आदमी पक्षाकडून लोकांसाठी उचलण्यात येणार्या पावलांची घोषणा करतील, असे सांगण्यात येत आहे. (हे ही वाचा Vir Chakra Award: भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान होणार वीर चक्र पुरस्काराने सन्मानित.)
यापूर्वी पक्षाच्या वतीने केजरीवाल यांच्या कार्यक्रमाची माहिती देताना ते महिलांसाठी मोठ्या घोषणा करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मोगा कार्यक्रमानंतर ते लुधियाना येथे पक्षाच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. मंगळवारी ते पक्षाच्या दुसऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार असून अमृतसरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. केजरीवाल यांनी गेल्या महिन्यात पंजाबलाही भेट दिली होती, त्यादरम्यान त्यांनी मानसा आणि भटिंडा जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला होता.