धक्कादायक! नवऱ्याने कापला 8 महिन्यांच्या गरोदर पत्नीचा गळा; सासरच्यांना फोन करून दिली हत्येची कबुली
चुलत सासऱ्याला फोन करून मी तुमच्या मुलीला मारले असल्याचे आरोपीने सांगितले. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नंदग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोर्टी गावात रविवारी रात्री एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याने 8 महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा चाकूने गळा चिरून खून (Murder) केला. घटनेनंतर आरोपीने स्वतः सासरच्या मंडळींना फोन करून घटनेची माहिती दिली. चुलत सासऱ्याला फोन करून मी तुमच्या मुलीला मारले असल्याचे आरोपीने सांगितले. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, रविवारी आरोपीने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
टिळा मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मी गार्डन येथे राहणारे रमेश पाल हे डेअरी संचालक आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 10 जुलै 2016 रोजी आपली मुलगी तन्नू हिचे लग्न नंदग्राम पोलीस स्टेशन हद्दीतील मोर्टी गावात राहणाऱ्या अंकित पालसोबत केले होते. अंकित एका खासगी कंपनीत काम करतो. लग्नानंतर 10 लाख रुपये आणि स्कॉर्पिओ गाडीची मागणी करत सासरच्यांनी तन्नूचा छळ सुरू केला. तसेच तन्नूने मुलीला जन्म दिल्यानंतर सासर मंडळीकडून तिचा छळ आणखी वाढत गेला. सासरचे लोक मुलीला मारहाण करायचे आणि जीवे मारण्याची धमकी देत होते, असंही रमेश पाल यांनी सांगितलं. (हेही वाचा - Crime: घटस्फोटाच्या मध्यस्थी बैठकीनंतर एका व्यक्तीकडून पत्नीची हत्या, पतीने केले आत्मसमर्पण)
रमेश पाल यांनी सांगितलं की, रविवारी रात्री जावई अंकित पाल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तन्नूची गळा चिरून हत्या केली. अंकितने स्वतः लहान भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. पहाटे चारच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या माहेरकडील लोकांनी घटनास्थळ गाठून गोंधळ घातला.
पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्नू सध्या 8 महिन्यांची गरोदर होती. 13 ऑगस्ट रोजी त्यांचा मुलगा सिंदारा देण्यासाठी मुलीच्या घरी गेला. मुलीने सासरच्या छळाबाबत सांगितले आणि वडिलांना पाठवा असे सांगितले. घरी आल्यानंतर मुलाने याबाबत वडिलांना सांगितले. पण, हळूहळू सर्व काही ठीक होईल, असे पीडितेच्या वडिलांना वाटले. आपल्या मुलीचे म्हणणे ऐकून तिला सासरच्या घरून आणले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता, अशी व्यथा पीडितेचे वडिल रमेश पाल यांनी व्यक्त केली.
एसएचओ नंदग्राम मुनेंद्र सिंह यांनी सांगितले की, 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा गळा कापून हत्या करण्यात आली. पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. नातेवाइकांच्या फिर्यादीवरून मृत पीडितेचा पती, ननंद-नंदोई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.