Haryana Murder Case: हरियाणात गाय तस्करीच्या संशयावरून 12वीच्या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या, ५ आरोपींना अटक

यात त्याचा मृत्यू झाला. आता पोलिसांना पाचही दोषी आरोपींना अटक केली आहे.

Photo Credit- X

Haryana Murder Case: हरियाणातील फरिदाबादमध्ये 12वीच्या विद्यार्थ्याला गो तस्कर समजून गोळ्या घालून ठार मारण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपी कथित गोरक्षक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी आर्यन मिश्राला गाय तस्कर समजून त्याची हत्या केली होती. त्याचबरोबर हत्येत वापरलेले शस्त्रही पोलिसांनी जप्त केली आहेत. ही घटना 23 ऑगस्ट रोजी दिल्ली-आग्रा महामार्गावरील गडपुरी टोलनाक्याजवळ घडली. आदेश, कृष्णा, वरुण आणि अनिल कौशिक अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी गोरक्षक असल्याचे सांगण्यात येत आहे.

असे सांगितले जात आहे की, आरोपींनी सुमारे 20 किलोमीटर कारचा पाठलाग केला आणि कारमध्ये बसलेल्या आर्यनवर तस्कर समजून गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन मिश्रा हा १२वीचा विद्यार्थी होता. 23 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता तो हर्षित आणि शँकी या मित्रांसोबत डस्टर कारमधून मॅगी खाण्यासाठी बाहेर पडला होता.

आर्यन हा गाय तस्कर असल्याचा संशय होता

पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी सांगितले की, त्यांना 23 ऑगस्टच्या रात्री उशिरा त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. ज्यामध्ये काही गाय तस्कर डस्टर आणि फॉर्च्युनर कारमधून शहरात रेकी करत असल्याचे म्हटले होते. ते लोक आपल्या मित्रांना बोलावून गायींना टँकरमध्ये नेत आहेत. असा संशय आल्याने गोरक्षकांनी गाडीचा पाठलाग सुरू केला आणि गाडी थांबवण्यासाठी गोळीबार सुरू केला. महामार्गावरील गडपुरी टोलनाक्यावर आरोपींनी कार थांबवण्यासाठी मागून गोळीबार केला. कारची मागील काच फोडून चालकाच्या शेजारी बसलेल्या आर्यन मिश्रा यांच्या मानेला जबर मार लागला. या लोकांनी भीतीपोटी गाडी थांबवली नाही. हर्षित गाडी चालवत होता आणि आर्यन बाजूच्या सीटवर बसला होता.

आरोपींनी पोलिसांची दिशाभूल केली

आर्यनला गोळी लागल्याने हर्षितने कार थांबवली. यानंतर हल्लेखोरांनी आर्यनच्या छातीत दुसरी गोळी झाडली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. फरिदाबाद पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अनिल कौशिक, वरुण, कृष्णा, आदेश आणि सौरव अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. आरोपींनी आधी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्यामध्ये आरोपींनी शस्त्र कालव्यात फेकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी अनिलच्या घरातून शस्त्रे जप्त केली.