Gujarat Robbery: सुरतमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत घुसून 13.26 लाख रुपये लुटले, चोरट्यांचा व्हिडिओ व्हायरल
या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Gujarat Robbery: गुजरातमधील सुरतमध्ये (Surat) भरदिवसा बँक लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरतमधील सचिन परिसरात दरोड्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पाच सशस्त्र दरोडेखोर बँकेत घुसून तब्बल 13.26 लाख रुपयांचा ऐवज लुटून पळून गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरोडेखोर बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना बंदुकीच्या जोरावर धमकावतानाही दिसतात. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे परिसरातील आणखी काही सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरतच्या सचिन भागातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या वांज शाखेत दोन दुचाकींवर सुमारे पाच जण दिवसाढवळ्या आले. ते बाईकवर येताना आणि बँकेच्या आवारात बाईक पार्क करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. या पाचही व्यक्तींनी हेल्मेट आणि चेहरे रुमालाने बांधलेले दिसतात. दुचाकीवरून उतरल्यानंतर ते बँकेत घुसले आणि बँकेत उपस्थित असलेल्या कर्मचार्यांवर आणि ग्राहकांवर शस्त्रे दाखवून धमकवण्याचा प्रयत्न करत आहे.
दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना धमकावून सुमारे 13.26 लाख रुपये लुटले. दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना धमकावून बँकेच्या स्वच्छतागृहाला कोंडून घेतले. त्यानंतर दरोडेखोरांनी रोखपालाला लॉकर उघडण्यास भाग पाडले, तेथे त्यांना 39,000 रुपये रोख रक्कम सापडली आणि त्यानंतर त्यांनी रोखपालाच्या डेस्कची तपासणी केली जिथून त्यांना उर्वरित रक्कम मिळाली. त्यानंतर दरोडेखोरांनी रोख रक्कम घेऊन पळ काढला. संपूर्ण घटना पाच मिनिटांत घडली. दरोड्याच्या वेळी कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती आहे. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच, तक्रार नोंदवला आहे. सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेल्या या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यात आला आहे. परिसरातील आणखी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जाणार आहे.