धक्कादायक: गॅस कंपनी इंडेनच्या वेबसाईटवर लीक झाला तब्बल 67 लाख ग्राहकांचा आधार डेटा

यावेळी प्रसिद्ध गॅस कंपनी इंडेन (Indane) च्या अधिकृत वेबसाईटवर हा डेटा लीक झाला आहे

आधार डेटा लीक (Photo Credits: IANS)

पुन्हा एकदा आधार डेटा लीक (Aadhaar Data Leak) झाला असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी प्रसिद्ध गॅस कंपनी इंडेन (Indane) च्या अधिकृत वेबसाईटवर हा डेटा लीक झाला आहे. तब्बल 67 लाख ग्राहकांच्या लीक झालेल्या या माहितीमध्ये, ग्राहकांचा आधार नंबर, त्यांचे नाव आणि त्यांच्या पत्त्याचाही समावेश आहे. वेबसाईटचे पेज गुगलशी इंडेक्स्ड होते त्यामुळे ही माहिती लीक झाली. तसेच सिक्युरिटीमध्ये झालेल्या छोट्याशा चुकीमुळे हे घडले असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच कंपनीकडून ही माहिती काढून टाकण्यात आली आहे. मात्र त्याआधी हा डेटा किती जणांपर्यंत पोहचला आहे याची माहिती मिळू शकली नाही.

वेबसाईट Techcrunch ने याबाबत माहिती दिली आहे. सुरुवातीला फक्त आधार नंबरच लीक झाल्याची माहिती होती. मात्र त्यानंतर ग्राहकांची नावे आणि पत्तेही दिसून आले. इंडेनच्या वेबसाईटवर 11,000 डीलर्सचा डेटा मिळाला ज्यामध्ये कस्टम बिल्ट स्क्रिप्टचा वापर केला होता. हा डेटा ब्लॉक होण्याआधी  5.8 मिलियन (58 लाख) ग्राहक तो वापरू शकतात. Techcrunch ने त्यांच्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, त्यांनी लीक झालेल्या आधार नंबरला UIDAI वेब-बेस्ड वेरिफेकेशन टूलच्या माध्यमातून तपासून पहिले ज्यात सगळे आधार नंबर बरोबर असल्याचे दिसून आले. (हेही वाचा : आधार कार्ड अपडेट: नाव, नंबर, पत्ता बदलण्यासाठी दरात बदल, द्यावे लागणार अधिक शुल्क)

आधार कार्ड भारत सरकारद्वारा जारी केलेले एक महत्वाचे ओळखपत्र आहे. यामध्ये 12 अंकांची एक विशिष्ट संख्या छापलेली असते, ज्यास भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणद्वारा जारी केले जाते. हा नंबर तुमचा ओळख नंबर असतो. हा नंबर देशामध्ये कोठेही तुम्ही तुमची ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून वापरू शकता.