Gaganyaan Mission: भारताच्या पहिल्या अंतराळातील मानवी मोहिमेदरम्यान PM Narendra Modi जाणार अवकाशात? जाणून घ्या काय म्हणाले ISRO अध्यक्ष एस सोमनाथ
प्रक्षेपण तारखेबद्दल बोलताना डॉ. सोमनाथ म्हणाले, ‘जर सर्व काही ठीक झाले, तर गगनयानचे पहिले चाचणी उड्डाण पुढील वर्षाच्या अखेरीस होणार आहे. परंतु सर्व काही आमच्या प्रगतीवर अवलंबून आहे.’
Gaganyaan Mission: भारत देश अवकाशात सतत नवा इतिहास रचत आहे. चांद्रयान आणि आदित्य मोहिमांच्या यशानंतर इस्रोचे पुढचे मिशन आहे 'गगनयान' (Gaganyaan). भारत 2025 पर्यंत आपले गगनयात्री म्हणजेच अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्याच्या तयारीत आहे. इस्रो आणि नासा यांचे हे संयुक्त अभियान असेल. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस. सोमनाथ (S Somnath) यांनी एनडीटीव्हीसोबत भारताच्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ यान 'गगनयान' बद्दल विशेष संवाद साधला.
या वर्षी गगनयानच्या अनेक गंभीर चाचण्या होणार आहेत. प्रक्षेपण तारखेबद्दल बोलताना डॉ. सोमनाथ म्हणाले, ‘जर सर्व काही ठीक झाले, तर गगनयानचे पहिले चाचणी उड्डाण पुढील वर्षाच्या अखेरीस होणार आहे. परंतु सर्व काही आमच्या प्रगतीवर अवलंबून आहे.’
गगनयान मोहिमेसाठी निवडलेल्या चार अंतराळवीरांचे वय वाढवण्याच्या प्रश्नावर इस्रोचे प्रमुख म्हणाले, ‘अशी कोणतीही समस्या नाही. वयाने फारसा फरक पडत नाही. अंतराळवीर वयाच्या 50 व्या वर्षीही अंतराळात जाऊ शकतात. देशाच्या पंतप्रधानांनी भारताच्या गगनयान मोहिमेवर जावे का? याबद्दल इस्रो प्रमुखांचे मत विचारले असता ते म्हणाले, ‘माझा विश्वास आहे की देशाचे पंतप्रधान जर अंतराळ स्थानकावर गेले तर त्यांनी आपल्या गगनयानमधूनच जावे. गगनयान मोहीम यशस्वी झाली की, आम्हाला खात्री आहे की आम्ही लोकांना सुरक्षितपणे तिथे पाठवू शकू. जर देशाचे पंतप्रधान आपले स्वतःचे रॉकेट आणि क्रू मॉडेलसोबत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले तर, ही नक्कीच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल.’
प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला हे भारतीय वायुसेनेचे चार चाचणी वैमानिक आहेत ज्यांची गगनयान मोहिमेसाठी निवड झाली आहे. या अंतराळवीरांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यापैकी दोघांना मिशन ट्रेनिंगसाठी अमेरिकेला पाठवण्यात येणार आहे. तेथे 3 महिने त्यांचे ट्रेनिंग चालेल. या दोन अंतराळवीरांपैकी एक अंतराळवीर गगनयात्री मोहिमेअंतर्गत भारतातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार आहे. (हेही वाचा: Hat-trick for Pushpak: इस्रोचा अंतिम पुन: वापरता येण्याजोगा लाँच व्हेईकल लँडिंग प्रयोग यशस्वी)
काय आहे 'गगनयान' मिशन?
गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहीम आहे. 'गगनयान' मोहिमेचे उद्दिष्ट 2025 मध्ये तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवून त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्याचे आहे. गगनयानमध्ये तीन अंतराळवीरांना खालच्या कक्षेत पृथ्वीपासून 400 किलोमीटर वर अंतराळात पाठवले जाईल. गगनयानचा पहिला चालक दल पृथ्वीच्या 16 प्रदक्षिणा करेल. इस्रोची गगनयान मोहीम यशस्वी झाल्यास, अमेरिका, चीन आणि तत्कालीन सोव्हिएत युनियननंतर मानवयुक्त अंतराळ उड्डाण करणारा भारत हा चौथा देश ठरेल.