चक्क सहाव्या दिवशीही पेट्रोल, डिझेल स्वस्त; ग्राहकांना मानसिक दिलासा, तरीही किमती ऐंशीपारच
त्यामुळे हा अल्प दिलासा किती काळ टिकणार असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
पेट्रोल, डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरामुळे हैराण असलेल्या जनतेला चक्क गेले सहा दिवस दिलासा मिळत आहे. पेट्रोल,डिझेलच्या किमतीमध्ये अल्पशी कपात होत असल्याचे चित्र असून, मंगळवारीही हे सातत्य कायम राहिले. राज्याची राजधानी मुंबईत मंगळवारी पेट्रोलचे दर १० पैशांनी तर डिझेलचे दर ८ पैशांनी कमी झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे मुंबईत पेट्रोल ८६. ८१ रुपये तर डिझेल ७८. ४६ रुपये प्रतिलिटर या दराने ग्राहकांना मिळत आहे. असे असले तरी, अद्यापही तेलाचे दर हे ऐंशीपारच आहेत. त्यामुळे हा अल्प दिलासा किती काळ टिकणार असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, राजधानी दिल्लीतही मंगळवारी पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये कपात पहायला मिळाली. दिल्लीतही पेट्रोल १० पैशांनी तर, डिझेल ७ पैशांनी स्वस्त झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल ८६.८१ रुपये प्रतिलीटर तर, डिझेल ७४.८५ रुपये प्रतिलीटर दराने मिळत आहे.(हेही वाचा,'ईपीएफओ'मध्ये लवकरच परिवर्तन; व्याजदरातही होणार मोठे फेरबदल)
दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किमतीमध्ये घट झाल्यामुळे त्याचे परिणाम देशातील पेट्रोल, डिझेलच्या दरांवर होत आहे. त्यामुळे अल्पसा का होईना ग्राहकांना दिलासा मिळताना दिसत आहे. मात्र, इतका दिलासा पुरेसा नाही. इंधनाचे दर आणखी कमी व्हायला हवेत तरच, ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील, असा सूर जनतेतून उमटत आहे.