High Court on Divorce Case: लाइफ पार्टनरवर अनैतिक संबंधाचा खोटा आरोप करणे देखील क्रूरता; घटस्फोटप्रकरणी महिलेला न्यायालयाने फटकारले

पत्नीने त्याच्या विरोधात अपील केले होते. पतीने उच्च न्यायालयातही धाव घेतली, जिथे पतीच्या वतीने सांगण्यात आले की, पत्नीने त्याच्यावर अनैतिक संबंधाचे खोटे आरोप लावले आहेत.

Divorce | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

High Court on Divorce Case: गुजरात हायकोर्टाने (Gujarat High Court) विवाहित जोडप्यामधील परस्पर कलह प्रकरणी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पत्नीच्या छळाला कंटाळून येथील बनासकांठा येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पत्नीने त्याच्या विरोधात अपील केले होते. पतीने उच्च न्यायालयातही धाव घेतली, जिथे पतीच्या वतीने सांगण्यात आले की, पत्नीने त्याच्यावर अनैतिक संबंधाचे खोटे आरोप लावले आहेत. त्यांना एक मुलगा देखील होता, ज्याला पत्नीने तिच्याकडे ठेवले.

पतीच्या म्हणण्यानुसार, महिलेने त्याचा आणि त्याच्या आईचा (सासू) छळ केला आणि त्यांना घर सोडण्यास भाग पाडले. पतीला घटस्फोट घ्यायचा होता, पण त्याचा अर्ज परत आला. त्यानंतर पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली. आता याप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. गुजरात उच्च न्यायालयाने महिलेचे अपील फेटाळून लावत तिला फटकारले. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर एखादी महिला तिच्या पतीवर अनैतिक संबंध असल्याचा खोटा आरोप करत असेल, तर ही देखील क्रूरता आहे. (हेही वाचा - Mental Cruelty: काय सांगता? तापट पत्नीच्या मानसिक अत्याचारामुळे पतीचे 21 किलो वजन झाले कमी; उच्च न्यायालयाची घटस्फोटाला मंजुरी )

मूळच्या प्रांतीज तालुक्यातील असलेल्या या शिक्षकाचा विवाह 1993 मध्ये झाला होता. त्याच्या पत्नीला 2006 मध्ये मुलगा झाला. मात्र, काही वेळाने पती-पत्नीमध्ये भांडण झाले. 2009 मध्ये पतीने गांधीनगरमध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पतीने आपल्या पत्नीवर त्याग आणि क्रूरतेचा आरोप केला आणि सांगितले की त्याला घटस्फोट हवा आहे.

कौटुंबिक न्यायालयात सांगण्यात आले की, पत्नी 2006 मध्ये घरातून निघून गेली होती आणि ती मुलासोबतही परतली नाही. पती आणि त्याच्या आईचा अर्ज स्वीकारून कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. यानंतर पत्नी संतापली. कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरोधात पत्नीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले.

दोन्ही पक्षांची उच्च न्यायालयात सुनावणी झाली. अखेर उच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला, त्या निर्णयात उच्च न्यायालयाने महिलेला फटकारले आणि तिचा अर्जही फेटाळला. न्यायमूर्ती म्हणाले की, कौटुंबिक न्यायालयात पतीचे कोणाशीही अनैतिक संबंध नाहीत हे सिद्ध झाले आहे, मग त्या आरोपांच्या आधारे पत्नी योग्य कशी ठरेल. जर कोणी आपल्या जोडीदारावर अनैतिक संबंधांचा खोटा आरोप लावला तर ते देखील क्रूरतेसारखेच आहे.