Ranjit Singh Disley with World Bank: रणजितसिंह डिसले गुरुजी यांची जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागार पदी नियुक्ती

मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ व्हावी. तसेच, जगभरामधील शिक्षकांच्या नेतृत्वगुणात कार्यक्षमता येण्याबरोबरच एकसूत्रताही यावी. शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळावा. त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसीत व्हावेत असा जागतिक बँकेच्या उपक्रमाचा उद्देश आहे.

Ranjit Singh Disley | (File Image)

सोलापूर येथील शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjit Singh Disley) यांच्या कार्याची दखल थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरुनही घेतली जात आहे. नुकताच त्यांना ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Award) देऊन गौरविण्यात आले. ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय शिक्षक ठरले. त्यानंतर आता त्यांना आणखी एक मानाचे स्थान मिळाले आहे. डिसले गुरुजी यांची जागतिक बँकेच्या (World Bank) शिक्षण विषयक सल्लागार (Education Advisor Of World Bank) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नियुक्ती असणार आहे. जगभरात शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी जागतिक बँकेने ग्लोबल कोच (Global Coach) नावाचा एक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने डिसले गुरुजी यांची निवड झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, जागतिक बँकेच्या उपक्रमानुसार जगभरातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा. मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ व्हावी. तसेच, जगभरामधील शिक्षकांच्या नेतृत्वगुणात कार्यक्षमता येण्याबरोबरच एकसूत्रताही यावी. शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळावा. त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसीत व्हावेत असा जागतिक बँकेच्या उपक्रमाचा उद्देश आहे. जागतिक बँकेने या उपक्रमांतर्गत ठेवलेली उद्दीष्टे पूर्ण व्हावीत यासाठी जगभरातून 12 जणांची निवड करण्यात आली आहे. यात डिसले गुरुजींचा समावेश होतो. (हेही वाचा, Ranjit Singh Disale Scholarships: ग्लोबल टीचर पुरस्काराने सन्मानित रणजितसिंह डिसले गुरुजी यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप)

डिसले गुरुजी यांच्या रुपात भारताला पहिल्यांदाच ग्लोबल शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे सहाजिकच भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विशेष म्हणजे डिसले गुरुजींचे नाव आता सातासमुद्रापारही गेले आहे. डिसले गुरुजींच्या नावाने इटलीमध्ये शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार, इटलीतील सॅमनिटे राज्यातील 10 विद्यार्थ्यांना 'कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप' दिली जाणार आहे. या शिक्षवृत्तीची रक्कम 400 युरो इतकी आहे. पुढील 10 वर्षे 100 मुलांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे.