QS World University Rankings 2024: क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 जारी; JNU ठरले भारतातील सर्वोच्च क्रमांकाचे विद्यापीठ
हे विद्यापीठ विकास अभ्यास श्रेणीमध्ये जागतिक स्तरावर 20 व्या क्रमांकावर आहे.
QS World University Rankings 2024: क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 (QS World University Rankings 2024) ची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीमध्ये प्रथमच भारतातील 69 विद्यापीठांसह विक्रमी 1,559 शिक्षण संस्थांचा समावेश झाला आहे. विषयानुसार क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये भारतीय विद्यापीठांनी उत्तम कामगिरी केली आहे. यावर्षी विक्रमी 69 भारतीय विद्यापीठांनी या रँकिंगमध्ये स्थान मिळवले आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 19.4% ची वाढ झाल्याचे दर्शवते.
जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (JNU) हे लंडनमधील उच्च शिक्षण विश्लेषण कंपनी क्यूएस (Quacquarelli Symonds) ने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतातील सर्वोच्च क्रमांकाचे विद्यापीठ ठरले आहे. हे विद्यापीठ विकास अभ्यास श्रेणीमध्ये जागतिक स्तरावर 20 व्या क्रमांकावर आहे. तर, चेन्नईस्थित सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेस दंत अभ्यास श्रेणीमध्ये जागतिक स्तरावर 24 व्या क्रमांकावर आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (अहमदाबाद) ही व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यास श्रेणीत जगातील शीर्ष 25 संस्थांमध्ये आहे, तर आयआयएम-बंगलोर आणि आयआयएम-कलकत्ता या शीर्ष 50 संस्थांमध्ये आहेत.
क्यूएसच्या मते, भारत हे जगातील सर्वात वेगाने विस्तारणाऱ्या संशोधन केंद्रांपैकी एक आहे. 2017 ते 2022 दरम्यान संशोधनात 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्यूएस अधिकाऱ्याने सांगितले की, भारत आता जगातील चौथा सर्वात मोठा संशोधन उत्पादक देश आहे आणि ब्रिटनला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे. आंतरराष्ट्रीय शैक्षणिक समुदायात भारत निःसंशयपणे एक मजबूत खेळाडू बनत आहे. अनेक देशांतून विद्यार्थी भारतात येऊन शिक्षण घेत आहेत. (हेही वाचा: IIT Bombay Unemployment Fake News: आयआयटी बॉम्बेमध्ये 36 टक्के विद्यार्थ्यांना मिळाल्या नाहीत नोकऱ्या? खुद्द संस्थेनेच आकडेवारी जारी करत सांगितले सत्य)
क्यूएसच्या सीईओ जेसिका टर्नर म्हणाल्या की, मागणी वाढत असतानाही उच्च दर्जाचे शिक्षण देणे हे भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, भारतातील तीन सर्वोत्तम खाजगीरित्या चालवल्या जाणाऱ्या संस्थांमधील अनेक कार्यक्रमांनी यावर्षी प्रगती केली आहे, जे भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्राला पुढे नेण्यासाठी सु-नियमित खाजगी तरतुदीची सकारात्मक भूमिका दर्शवते.