पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 8 ते 12 जुलै 2020 दरम्यान आयोजन; मुंबई जिल्ह्यात 16,726 रोजगाराच्या संधी उपलब्ध, जाणून घ्या कुठे करावी नोंदणी

या रोगामुळे फक्त आरोग्य सेवेवरच ताण पडला नाही, तर देशाची अर्थव्यवस्थाही डळमळीत झाली आहे. या दरम्यान अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले.

Representational Image (Photo Credit: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे, भारत हा त्यापैकी सर्वात प्रभावित देशांपैकी एक आहे. या रोगामुळे फक्त आरोग्य सेवेवरच ताण पडला नाही, तर देशाची अर्थव्यवस्थाही डळमळीत झाली आहे. या दरम्यान अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. अशात या लोकांना पुन्हा उभारी घेण्याची एक नामी संधी चालून आली आहे. मुंबई शहर (Mumbai) आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुशल तसेच अकुशल उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे (Pandit Deendayal Upadhyaya Online Employment Fair) आयोजन होणार आहे. 8 ते 12 जुलै, 2020 दरम्यान या मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी जवळपास 16,726  रोजगारांच्या संधी (Employment Opportunities) उपलब्ध झाल्या आहेत.

या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये नियोक्त्यांकडून उमेदवारांच्या मुलाखती स्काईप, व्हॉट्सॲप आदींच्या माध्यमातून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचे नियोजन आहे.

या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध –

गवंडी, सुतारकाम, फीटर (स्टील फिक्सींग), फीटर (बार बेंडींग), वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन

कामाचे ठिकाण -

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्रे, मुंबई यांचेकडील मुंबई शहर, मुंबई उपनगर तसेच ठाणे येथील विविध पायाभूत प्रकल्पांमध्ये हे रोजगार उपलब्ध असतील

इथे करा नोंदणी –

सदरच्या ऑनलाईन मेळाव्यामध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदविलेल्या रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्डने लॉगिन करावे व पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा यावर क्लिक करून मुंबई उपनगर जिल्ह्यातील उमेदवारांनी मुंबई उपनगर जिल्हा निवडून उपलब्ध कंपनीला नोकरीसाठी अर्ज करावा. (हेही वाचा: कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी, हॉस्पीटल मॅनेजर, स्टाफ नर्स, वॉर्डबॉय, फार्मासिस्ट यांसह विविध पदांसाठी नोकर भरती)

संपर्क क्रमांक –

वेब पोर्टलवर रोजगार मेळाव्यात सहभाग घेताना काही अडचण उद्भवल्यास, मुंबई शहरच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी दूरध्वनी क्र. 22626303 किंवा ई-मेल-mumbaicity.employment@gmail.com आणि मुंबई उपनगरच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी दूरध्वनी क्र. 22626440 किंवा ई-मेल  mumbaisuburbanrojgar@gmail.com  वर संपर्क साधावा.

अशा प्रकारे लॉक डाऊनमध्ये मुंबई परिसरातील तरुणांना कामाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने केले आहे.