प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

4 ऑक्टोबरपासून मुंबईत (Mumbai) शाळा सुरू करण्यास अखेर मंजुरी मिळाली आहे. कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील शाळा बंद होत्या. आता इतके महिने घरात कैद असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तर दिसणार आहे. 31 मार्च 2020 पासून मुंबईत शाळा पूर्णपणे बंद होत्या, तेव्हापासून मुले घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेत होती. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी बुधवारी सांगितले की, 4 ऑक्टोबरपासून मुंबईत 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा उघडल्या जातील. उर्वरित वर्गांसाठी, बीएमसी नोव्हेंबरमध्ये निर्णय घेईल. ते म्हणाले की, सरकारने जारी केलेल्या सर्व कोरोनासाठी एसओपी लागू केले जातील.

लॉकडाऊनचा एक भाग म्हणून राज्य शासनाने राज्यातील सर्व शासकीय/खाजगी व्यवस्थानाच्या अनुदानित विना अनुदानित/स्वयं अर्थसहाय्यीत शाळा/कनिष्ठ महविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वी व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग दि 4 ऑक्टोबर 2021 पासून सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. निर्णयामधील मार्गदर्शक सूचना सोबतच खालीलप्रमाणे अन्य सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.