Schools Reopen: राज्यातील कोरोनामुक्त गावांत पुढील आठवड्यापासून पुन्हा भरणार शाळा

कोविड-19 संकटामुळे मागील वर्षभरापासून शाळा बंद होत्या. ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरु होते. मात्र आता पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे शाळा भरणार आहेत.

School Reopen (Photo Credits: PTI)

राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये पुढील आठवड्यापासून शाळा सुरु होणार आहेत. कोविड-19 संकटामुळे मागील वर्षभरापासून शाळा बंद होत्या. मात्र ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरु होते. परंतु, आता पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे शाळा भरणार आहेत. मागील महिन्याभरापासून कोरोनाचे रुग्ण न आढळलेल्या ग्रामीण भागात 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा 15 जुलै पासून सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. (शाळा सुरु करताना काय असतील कोरोनाचे नियम; जाणून घ्या)

सध्या राज्यातील विविध भागातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी एका वेगळ्या दृष्टीकोनातून मार्ग काढण्याची गरज होती, असेही त्यांनी सांगितले. शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या लसीकरण होणे गरजेचे आहे. यासोबतच राज्य सरकारने जारी केलेल्या सर्व कोरोना संबंधित नियमांचे शाळांकडून पालन होणे बंधनकारक आहे, असेही त्या म्हणाल्या.

Varsha Gaikwad Tweet:

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा धोकादायक ठरु शकतो. ज्या गावांमध्ये गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचे रुग्ण आढळले नाहीत त्या गावात यापुढेही कोणाला कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी ग्रामपंचायतीने घेणे गरजेचे आहे. कोरोनामुक्त गाव ठरवण्यासाठी 8 सदस्यांची कमिटी नेमण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हाधिकारी, शाळेतील मुख्याध्यापक आणि आरोग्य अधिकाऱ्यांचा समावेश असेल. तर ग्रामीण भागांमध्ये ग्रामपंचायतींकडून ही कमिटी चालवण्यात येईल.