Maharashtra CM Fellowship Program: मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी 5 मे 2025 पर्यंत करू शकाल अर्ज; मिळणार दरमहा 61,500 रुपये छात्रवृत्ती, जाणून घ्या निकष, अनुभव, पात्रता, निवड प्रक्रिया
या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी 15 एप्रिल ते 5 मे 2025 या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जाकरिता शुल्क रुपये 500 रुपये असेल. फेलोंची नियुक्ती 12 महिने कालावधीसाठी असेल. यामध्ये वाढ करण्यात येणार नाही.
महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तरुणांना प्रशासनासोबत थेट काम करण्याची संधी मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26’ची (Maharashtra CM Fellowship Program) घोषणा केली आहे. या फेलोशिपनुसार, 60 फेलो निवडले जातील. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचे उद्दिष्ट राज्यातील तरुणांना प्रशासकीय प्रक्रिया, धोरणे आणि निर्णय प्रक्रियेचा थेट अनुभव देणे हा आहे. तंत्रज्ञानाप्रती तरुणांची विचार करण्याची क्षमता, जागरूकता आणि रस प्रशासनासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. निवडलेल्या लोकांना राज्यातील विविध प्रशासकीय कार्यालयांमध्ये काम करण्याची संधी दिली जाईल.
या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी 15 एप्रिल ते 5 मे 2025 या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जाकरिता शुल्क रुपये 500 रुपये असेल. फेलोंची नियुक्ती 12 महिने कालावधीसाठी असेल. यामध्ये वाढ करण्यात येणार नाही. तसेच फेलो रुजु झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांनी त्याची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल. या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये 56,100/- व प्रवासखर्च रुपये 5,400/- असे एकत्रित रुपये 61,500/- छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.
फेलोंच्या निवडीचे निकष:
अर्जदार भारताचा नागरिक असावा. तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान 60% गुण आवश्यक) असावा.
अनुभव:
किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप/अप्रेंटीसशिप/आर्टीकलशिपसह 1 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.
भाषा व संगणक ज्ञान:
मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.
वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान 21 वर्षे व कमाल 26 वर्षे असावे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहीत केलेल्या ऑनलाईनअॅप्लिकेशन प्रणालिद्वारे उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.
या कार्यक्रमात फेलोंची संख्या 60 इतकी निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या 1/3 राहील. 1/3 महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल. फेलोंचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल.
निवड प्रक्रिया:
फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा (Online Objective Test) द्यावी लागेल. ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालनालयाच्या mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल व त्यातील अटी व शर्तीचे उमेदवाराने पालन करणे आवश्यक राहील. (हेही वाचा: RRB ALP Recruitment 2025: रेल्वेमध्ये होणार तब्बल 9,970 असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती; आजपासून करू शकाल अर्ज, जाणून घ्या पात्रता, अर्ज व निवड प्रक्रिया)
यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलो पुनश्चः या कार्यक्रमांतर्गत फेलो निवडीसाठी पात्र असणार नाहीत. तसे फेलोंनी अर्जात नमूद करणे आवश्यक राहील. वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या सुमारे 210 उमेदवारांना दिलेल्या विषयांपैकी एका विषयावरील निबंध विहित तारखेस व वेळेत ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागेल.
कामाच्या संधी:
वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या 210 उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे घेण्यात येईल. निवड झालेल्या फेलोंपैकी आवश्यकतेनुसार निवडक 20 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन ते तीन फेलोंचा गट नियुक्त करण्यात येईल. या गटातील एक फेलो संबंधित जिल्हाधिकारी व एक ते दोन फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद यांच्या अधिनस्त काम पाहतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)