JEE Main, NEET, CUET 2023 Exam Dates: आगामी शैक्षणिक वर्षापासून NTA Exams साठी तयार होणार निश्चित कॅलेंडर; nta.ac.in वर आठवडाभरात यंदाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता
या कॅलेंडरमुळे इच्छुकांना स्पर्धा परीक्षांची चांगली तयारी करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
भारतामध्ये स्पर्धा परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना नीट आयोजन करता यावं या उद्देशाने आता देशात पदवीपूर्व परीक्षांसाठी निश्चित परीक्षांचं कॅलेंडर जारी केले जाणार आहे. सध्या प्रशासन त्याच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी विविध पातळ्यांवर काम करत अहे. जेईई (JEE), नीट युजी (NEET UG) आणि सीयूईटी (CUET) या महत्त्वाच्या परीक्षांसाठी आता शैक्षणिक वर्ष 2023 पासून निश्चित कॅलेंडर जारी केले जाणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिक्षण मंत्रालय या आठवड्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि यूजी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी वार्षिक परीक्षा कॅलेंडर जाहीर करू शकते. त्याच वेळी, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, एनटीए या आठवड्यातच जेईई मेन अधिसूचना आणि परीक्षेच्या तारखा देखील जारी करू शकतात. सध्या विद्यार्थी यंदाच्या परीक्षा तारखांकडे डोळे लावून बसले आहेत. अहवालानुसार, जेईई मेनचे आयोजन जानेवारीच्या मध्य ते एप्रिल दरम्यान केले जाऊ शकते, CUET UG एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून मेच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केले जाऊ शकते आणि NEET UG मेच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केले जाऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूजीसीने देखील एक समिती बनवली आहे जी निश्चित परीक्षा कॅलेंडरसाठी काम करत आहे. या कॅलेंडरमुळे इच्छुकांना स्पर्धा परीक्षांची चांगली तयारी करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. UPSC Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध पदांसाठी जाहीर केली भरती प्रक्रिया; उमेदवाराला मिळणार 7 व्या वेतन आयोगानुसार पगार .
2020 मध्ये, कोविड-19 महामारीच्या परिस्थितीचा परिणाम नीट, जेईई परीक्षांच्या वेळापत्रकावरही झाला होता आणि तेव्हापासून एजन्सी वेळापत्रक पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. परीक्षा नियोजनबद्ध पद्धतीने व्हाव्यात आणि विद्यार्थ्यांना वेळेवर प्रवेश मिळावा, यासाठी आता शिक्षण मंत्रालय निश्चित कॅलेंडर तयार करणार आहे. अशी माहिती UGC चे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, NEET, JEE आणि CUET सारख्या परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक तयार केले जाईल जेणेकरून कोणाच्याही तारखा क्लॅश होणार नाही.