खुशखबर! आयटी कंपनी Cognizant ची मोठी घोषणा; 2021 मध्ये देणार तब्बल 28,000 फ्रेशर्सना नोकरी

कंपनीने असे म्हटले आहे की 2021 मध्ये भारतात 28,000 फ्रेशर्सना नोकरी देण्याची त्यांची योजना आहे

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारतामधील अनेक लोकांना कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. याकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, कित्येकांचे उद्योग बंद पडले आहेत. अशात आयटीमध्ये (IT) काम करू इच्छित असणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. आयटी क्षेत्र हे बहुतेक तरुणांचे पसंतीचे क्षेत्र मानले जाते. सध्याच्या कोरोनाच्या काळात आयटी कंपनी कॉग्निझंट (Cognizant) मोठ्या प्रमाणावर नोकरभरती (Recruitment) करणार आहे. कंपनीने असे म्हटले आहे की 2021 मध्ये भारतात 28,000 फ्रेशर्सना नोकरी देण्याची त्यांची योजना आहे. 2020 मध्ये कंपनीने 17,000 फ्रेशर्सना कामावर घेतले होते.

कॉग्निझंट ही एक अमेरिकन कंपनी आहे आणि त्यांच्याकडे एकूण 2,96,500 कर्मचारी कार्यरत आहेत. भारतात कंपनीचे दोन लाखाहून अधिक कर्मचारी आहेत. कॉग्निझंटमध्ये एट्रिशन (Attrition) म्हणजेच नोकरी सोडून जाणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे व त्याचा परिणाम कंपनीच्या महसुलावरही होत आहे. 2021 वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे ऐच्छिक एट्रिशन 18 टक्के राहिले. म्हणूनच कंपनी आता फ्रेशर्स नेमण्याच्या प्रक्रियेत आहे.

कॉग्निझंट सीईओ ब्रायन हम्फ्रीज म्हणाले की, कंपनी एट्रिशनबाबत पावले उचलण्यासाठी काम करीत आहे. ते पुढे म्हणाले की, ‘गेल्या काही महिन्यांत कंपनीमध्ये राजीनाम्यावर आधारित एट्रिशनमध्ये हळूहळू वाढ दिसून येत आहे. भारतामध्ये दोन महिन्यांचा नोटीस कालावधी आहे, यामुळे आम्हाला माहित आहे की दुसऱ्या तिमाहीत किती कर्मचारी नोकरी सोडतील. परंतु यादरम्यान, आम्ही वेगाने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कामावर घेत आहोत’

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, आव्हानांना तोंड देण्यासाठी कंपनी  अनेक योजना राबवित आहे. यामध्ये इंटरनल एंगेजमेंटचे प्रयत्न वाढविणे आणि ट्रेनिंग प्रोग्रॅम, जॉब रोटेशन तसेच ग्रोथसाठी जास्तीत जास्त संधी उपलब्ध करुन देण्यासाठी लोकांमध्ये इंव्हेस्टमेंट वाढवणे यांचा समावेश आहे. यासह, तिमाही प्रमोशन, पगार वाढ, हाय स्किल डिमांड यांसारख्या महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या जात आहेत. (हेही वाचा: सेंट्रेल रेल्वेत सीनियर रेजिडेंटच्या पदासाठी नोकर भरती, 'या' पद्धतीने होईल उमेदवाराची निवड)

दरम्यान, कंपनीने आपला पहिला तिमाही निकाल सादर केला आहे. मार्च 2021 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल 4.4 अब्ज डॉलर्स होता. त्यात 2.4 टक्के वार्षिक वाढ झाली आहे.