Entrance Exam for FYJC: 11 वी प्रवेशासाठी जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार CET परीक्षा; जाणून घ्या काय असेल स्वरूप
ही प्रवेश परीक्षा पुर्णतः ऐच्छिक असणार आहे असे त्यांनी सांगितले.
कोविड-19 चा प्रादुर्भाव पाहता राज्यात 10 वी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यामुळे सन 2021-22 या वर्षासाठी इ. 11 वी प्रवेशासाठी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये कार्यपध्दती विहीत करण्यात आली आहे. इ. 10 वी निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता, इ. 11 वी प्रवेशासाठी एकवाक्यता रहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक (Optional) सामाईक प्रवेश परीक्षा (CET) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाणार असल्याची माहिती मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. ही प्रवेश परीक्षा पुर्णतः ऐच्छिक असणार आहे असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या, सर्व मंडळांच्या म्हणजेच राज्य मंडळ, सीबीएसई (CBSE), सीआयएससीई (CISCE) व सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे यांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात येईल. शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ/महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा आयोजित करण्यात येईल. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ/परीक्षा परिषदेमार्फत घोषित करण्यात येईल.
ही सीईटी परीक्षा राज्य मंडळाच्या इ. 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. सदर 100 गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील तसेच OMR पद्धतीने 2 तासांची परीक्षा घेण्यात येईल. यात इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील. परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात MBA, MMS कोर्सच्या प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन mba2021.mahacet.org वर सुरू)
इयत्ता 10 वीचा निकाल साधारणत: 15 जुलै दरम्यान लागल्यानंतर राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी इ. 10 वीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी इ. 10 परीक्षेसाठी परीक्षा शुल्क अदा केलेले असल्याने, अशा विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, सीबीएसई, सीआयएससीई, सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे इत्यादी अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी राज्य मंडळाकडून/परीक्षा परिषदेकडून विहित करण्यात येणारे शुल्क अदा करावे लागेल.