Country’s First All-Girls Sainik School: उत्तर प्रदेशच्या वृंदावनमध्ये सुरु झाली मुलींसाठी देशातील पहिली सैनिक शाळा; जाणून घ्या प्रवेश प्रक्रिया
येथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना सीबीएसई अभ्यासक्रमाच्या अभ्यासासोबत लष्करी प्रशिक्षणही दिले जाणार आहे. शाळेत माजी सैनिक किंवा एनसीसी प्रशिक्षकांमार्फत खेळ आणि इतर प्रशिक्षणही दिले जाईल.
All-Girls Sainik School: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) वृंदावनमध्ये (Vrindavan) मुलींसाठी देशातील पहिली सैनिक शाळा (Country’s First All-Girls Sainik School) सुरू झाली आहे. या शाळेत 120 जागा आहेत. येथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना सीबीएसई अभ्यासक्रमाच्या अभ्यासासोबत लष्करी प्रशिक्षणही दिले जाणार आहे. शाळेत माजी सैनिक किंवा एनसीसी प्रशिक्षकांमार्फत खेळ आणि इतर प्रशिक्षणही दिले जाईल. भारत सरकारकडून सैनिक स्कूल चालविण्यास परवानगी मिळाल्यानंतर वात्सल्य गावात असलेल्या संविद गुरुकुल वरिष्ठ माध्यमिक विद्यालयाचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संरक्षण मंत्री म्हणाले की, ज्या मुलींना सैन्य दलात भरती होऊन मातृभूमीची सेवा करायची आहे त्यांच्यासाठी संविद गुरुकुलम कन्या सैनिक शाळा ही प्रकाशकिरण आहे. (हेही वाचा: MPSC Estimated Schedule for 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर, घ्या जाणून)
या सैनिक शाळेत सहावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी अखिल भारतीय स्तरावरील परीक्षेला बसावे लागेल. येत्या 21 जानेवारी रोजी शाळेत प्रवेशासाठी लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे ई-समुपदेशन होणार असून त्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यानंतर, नवीन सत्र या वर्षी म्हणजेच एप्रिल 2024 पासून सुरू होईल. मुलींना तीन बॅचमध्ये प्रवेश दिला जाईल.
कन्या सैनिक शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलींचा दिनक्रम सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत असेल. सकाळची सुरुवात कवायतीने होईल. यानंतर सैनिक स्कूल सोसायटीने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमानुसार मुलींना शिक्षण दिले जाईल. सायंकाळी विविध खेळ, परेड प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. याशिवाय शाळेत स्केटिंग, व्हॉलीबॉल, रायफल शूटिंग आणि घोडेस्वारीचा सरावही होणार आहे.
2019 मध्ये, संरक्षण मंत्र्यांनी शैक्षणिक सत्र 2021-22 पासून टप्प्याटप्प्याने सैनिक शाळांमध्ये मुलींच्या प्रवेशास मान्यता दिली होती. मिझोराममधील सैनिक स्कूल छिंगछिप येथे संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या पथदर्शी प्रकल्पाच्या यशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, 100 नवीन सैनिक शाळांच्या स्थापनेमागील उद्दिष्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे आणि त्यांना सशस्त्र दलात सामील होण्यासह उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.