भारताबाहेर शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; आता परदेश शिष्यवृत्तीसाठी 28 ऑगस्टपर्यंत करू शकाल अर्ज, मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी अर्जाची मुदत वाढवण्यात आली आहे.
भारताबाहेर शिक्षण (Higher Studies in Abroad) घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी अर्जाची मुदत वाढवण्यात आली आहे. याआधी परदेश शिष्यवृत्तीसाठी सन 2020-21 या नवीन शैक्षणिक वर्षात लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी 14 ऑगस्ट ही मुदत देण्यात आली होती. मात्र आता कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यात 15 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी याबाबत माहिती दिली.
गेल्या 4 महिन्यांपासून राज्यात कोरोना विषाणूचे थैमान सुरु आहे. अशात सरकारने ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यासोबतच विद्यार्थ्यांना इतर अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊन परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण आयुक्तालयाने, ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे स्वीकारावेत अशा सूचना श्री. मुंडे यांनी याअगोदरच दिलेल्या आहेत. तसेच अर्ज करण्यासाठीची मुदत आता 15 दिवसांनी वाढवून दिली आहे. (हेही वाचा: परदेशात उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना दिलासा; आता पदवी आणि परदेशातील पदव्युत्तर शाखा वेगळी असली तरी विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र)
याआधी अजून एक महत्वाचा निर्णय घेत, कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अन्य शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्ज सादर करता येणार आहे. त्याचबरोबर योजनेतील वयोमर्यादेबाबतचा अडचणी ही आता सोडविल्या आहेत. दरम्यान 28 ऑगस्ट 2020 पर्यंत नवीन शैक्षणिक वर्षातील इच्छुक विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्ती साठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे समाज कल्याण विभागास सादर करावेत असे श्री . धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.