CBSE Board Exam 2021: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; फेब्रुवारी 2021 पर्यंत होणार नाही सीबीएसई बोर्ड परीक्षा
त्या पार्श्वभूमीवर निशंक म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नवीन पॅटर्नच्या आधारे तयारीसाठी पुरेसा वेळ दिला जाईल. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या जातील.
केंद्रीय आणि माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षा 2021 विषयी लाखो विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अनेक प्रश्न आहेत. यापैकी काही प्रश्नांची उत्तरे शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक (Education Minister Ramesh Pokhriyal) यांनी मंगळवारी शिक्षकांशी ऑनलाइन संवादादरम्यान दिली. सीबीएससी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. किमान जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 मध्ये तरी बोर्डाची परीक्षा होणार नाही. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी मंगळवारी याची घोषणा केली. बोर्डाच्या परीक्षांचा निर्णय नंतर घेण्यात येईल असेही निशंक म्हणाले.
या संवादामध्ये एका शिक्षकाने प्रश्न विचारला की सीबीएसई बोर्ड परीक्षा 2021 तीन महिने पुढे ढकलता येईल का? त्याला उत्तर म्हणून निशंक म्हणाले की परीक्षा तीन महिन्यांकरिता पुढे ढकलली जाईल की नाही, हे आता स्पष्टपणे सांगता येणार नाही. परंतु यापूर्वी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ज्या परीक्षा सुरू होत होत्या, त्या यावेळी होणार नाहीत. निशंक यांनी सांगितले की, फेब्रुवारी 2021 पर्यंत सीबीएसई बोर्डाची परीक्षा होणार नाही. फेब्रुवारीनंतर परीक्षा कधी घ्यायची याविषयी चर्चा सुरू आहे. निशंक आधीच म्हणाले आहेत की, विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ दिला जाईल. त्यांनी 10 डिसेंबर रोजी सांगितले होते की मार्चमध्येच परीक्षा घेण्याची सक्ती नाही. (हेही वाचा: FYJC Admissions 2020 Special Round Schedule: 11 वी प्रवेश प्रकियेसाठी आजपासून विशेष फेरीचं आयोजन; इथे पहा वेळापत्रक)
मे महिन्यादरम्यान मंडळाच्या परीक्षा घेण्याची मागणी पालकांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर निशंक म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नवीन पॅटर्नच्या आधारे तयारीसाठी पुरेसा वेळ दिला जाईल. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या जातील. प्रॅक्टिकलदेखील कोणत्याही प्रवेश परीक्षेच्या तारखेला होणार नाही.’ 2021 च्या बोर्ड परीक्षांसाठी सीबीएसईने 30 टक्के अभ्यासक्रम कमी केला असल्याचे निशंक म्हणाले होते. तसेच मार्कशीटमधून फेल हा शब्द काढून टाकला आहे. दरम्यान, सीबीएसईने आधीच स्पष्ट केले आहे की या परीक्षा ऑनलाइन होणार नाहीत, विद्यार्थी या परीक्षा पेन पेपर पद्धतीनेच देतील.