CBSE Board 12th Exam 2021: 12 वीच्या परीक्षेसंदर्भात आज संरक्षणमंत्री, शिक्षणमंत्री यांच्यासह मोठ्या नेत्यांची उच्चस्तरीय बैठक
बैठकीत काही निवडक विषयांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
CBSE Board 12th Exam 2021: सीबीएसई बारावीच्या परीक्षेसंदर्भात आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. परीक्षेबाबतच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आज उच्चस्तरीय बैठक बोलविण्यात आली आहे. सकाळी 11.30 वाजता केंद्र आणि राज्य सरकारच्या या आभासी बैठकीत अनेक बाबींचा विचार केल्यानंतर बारावीची परीक्षा होणार की नाही, हे ठरवणार आहे? केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल निशंक, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बोलावलेल्या या बैठकीत सर्व राज्यांचे आणि केंद्रीय शासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, परीक्षा घेत असलेल्या मंडळांचे अध्यक्ष, परीक्षा नियंत्रणाशी संबंधित अन्य संस्थांचे अधिकारी उपस्थित राहतील.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल निशंक यांनी शनिवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत जे काही निर्णय घ्यायचे आहेत त्याबाबत राज्य सरकारांचे मत आणि त्यासंदर्भातील सर्व संस्थांचा समावेश केला पाहिजे. कोरोनामुळे सर्व राज्यांतील शिक्षण मंडळे सीबीएसई, आयसीएसई यांनी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यासह एनटीएसह राष्ट्रीय परीक्षा घेणाऱ्या इतर संस्थांनीही या परीक्षा स्थगित केल्या आहेत. बारावीच्या परीक्षेसंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी केंद्र सरकार सर्व बाबींचा विचार करणार आहे. (वाचा - Medical Students Examinations: राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता 10 ते 30 जून दरम्यान घेण्यात येणार - अमित देशमुख)
दरम्यान, बैठकीत काही निवडक विषयांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. जेणेकरून यंदा विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल. तसेच, सामान्य विषयांमधील अंतर्गत मूल्यांकनांच्या आधारे पदोन्नतीचा विचार केला जाऊ शकतो. त्याद्वारे आज नीट आणि जेईई मेन्सच्या परीक्षेच्या तारखेविषयी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.