Covid19: कोरोना विषाणूमुळे CRPF च्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू
कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. तसेच कोरोना विषाणूचे वाढते प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे
कोरोना विषाणूचे (Coronavirus) जाळे हळूहळू संपूर्ण भारतात पसरत चालले आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. तसेच कोरोना विषाणूचे वाढते प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, कोरोना विषाणूविरोधातील लढ्यात महत्वाचा वाटा उचलणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचारीही कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. यातच कोरोना विषाणूमुळे आज केंद्रीय राखीव पोलीस दलातील (Central Reserve Police Force) एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. करोना विषाणूमुळे निमलष्करी दलात झालेला हा पहिला मृत्यू आहे. देशातील निमलष्करी दल केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येतात. देशांतर्गत सुरक्षेबरोबर सीमारेषेवर सीआरपीएफच्या जवानांची तैनाती केली जाते.
बीएसएफ, सीआयएसएफमध्येही काही जणांना करोनाची लागण झाली आहे. सीआरपीएफ हे देशातील सर्वात मोठे निमलष्करी दल आहे. जवान आणि अधिकारी मिळून सीआरपीएफमध्ये 3 लाख 25 हजार कर्मचारी आहेत. नक्षलवाद आणि काश्मीर खोऱ्यात दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये सीआरपीएफचा सहभाग असतो. दरम्यान, कोरोनाची लागण झाल्यामुळे दिल्लीतील एका रुग्णालयात सहाय्यक निरीक्षक पदावरील सीआरपीएफच्या अधिकाऱ्यावर उपचार सुरु होते. ते 55 वर्षाचे असून दिल्लीत असलेल्या सीआरपीएफच्या बटालियनमध्ये हा अधिकारी तैनात होता. हे देखील वाचा- कोरोना विषाणूबद्दल माहिती: बेस्टच्या 15 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण; एकाचा मृत्यू
जगभरात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 30 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 3 लाखांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 29 हजार 974 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 937 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 7 हजार 027 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.