Pushpa 2 Stampede Case: तेलंगणा उच्च न्यायालयाने (Telangana High Court) सोमवारी राज्य सरकार आणि चित्रपटगृहांना 16 वर्षांखालील मुलांना सकाळी 11 वाजण्यापूर्वी आणि रात्री 11 नंतर चित्रपटगृहात प्रवेश देऊ नये असे निर्देश दिले. चित्रपट तिकिटांच्या वाढत्या किमती आणि विशेष शोच्या परवानग्यांशी संबंधित याचिकेच्या सुनावणीनंतर हा निर्णय देण्यात आला. न्यायमूर्ती विजयसेन रेड्डी यांनी असे म्हटले आहे की, मुलांना सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा चित्रपट पाहण्याची परवानगी दिल्याने त्यांच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यांनी आपल्या आदेशाचे समर्थन करण्यासाठी पुष्पा 2 चेंगराचेंगरीच्या (Pushpa 2 Stampede Case) घटनेचाही उल्लेख केला.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने काय म्हटले?
न्यायालयाने पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची आठवण करून दिली, ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. न्यायमूर्ती विजयसेन रेड्डी यांनी सांगितले की, सिनेमॅटोग्राफीच्या नियमांनुसार, मुलांना सकाळी 8.40 च्या आधी आणि 1.30 नंतर चित्रपट पाहण्याची परवानगी देऊ नये. मुलांना सकाळी लवकर आणि रात्री उशिरा चित्रपट पाहू देऊ नये. (हेही वाचा - 'Pushpa 2' Premiere Stampede: 'पुष्पा 2'च्या प्रीमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू; हैदराबाद पोलिसांनी Allu Arjun आणि थिएटरच्या व्यवस्थापनाविरुद्ध दाखल केला गुन्हा)
न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश -
उच्च न्यायालयाने शिफारस केली आहे की, राज्य सरकारने सर्व पक्षांना 16 वर्षांखालील मुलांच्या थिएटर आणि मल्टिप्लेक्समध्ये सकाळी 11 वाजण्यापूर्वी आणि रात्री 11 नंतर प्रवेशाचे नियमन करण्याचे निर्देश द्यावेत. मुलांच्या प्रवेशाचे नियमन करण्यासाठी सर्व भागधारकांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचा सल्ला गृह विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आला आहे. (हेही वाचा - Allu Arjun Granted Regular Bail: संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला मोठा दिलासा; नामपल्ली न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर)
रात्री उशिरापर्यंत स्क्रीन टाइमचा मुलांवर परिणाम -
रात्री उशिरापर्यंत जास्त स्क्रीन टाइमचा मुलांवर होणाऱ्या परिणामाबद्दलही न्यायमूर्ती रेड्डी यांनी चिंता व्यक्त केली. याचिकाकर्त्याच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायालयाने यावर भर दिला की मुलांना रात्री उशिरा, विशेषतः मध्यरात्रीनंतर किंवा सकाळी लवकर चित्रपट पाहण्यासाठी बाहेर जाऊ दिल्याने त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. चित्रपट तिकिटांच्या किमतीत वाढ आणि विशेष शोना मंजुरी देण्याशी संबंधित याचिकांवर सुनावणी करताना न्यायमूर्ती बी विजयसेन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.