Chef Vishnu Manohar Will Prepare Ram Halwa: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी नागपूरचे शेफ विष्णू मनोहर तयार करणार 7000 किलो 'राम हलवा'
विष्णू मनोहर यांनी सांगितले की, आम्ही या उपक्रमाला 'कार सेवा ते पाक सेवा' असे नाव दिले आहे. त्याच्याशी आमच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. आंदोलनादरम्यानची अयोध्या आणि आजची अयोध्या यात खूप फरक आहे.
Chef Vishnu Manohar Will Prepare Ram Halwa: अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) भव्य अभिषेक सोहळ्याची देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणा (Ram Mandir Pran Pratishtha) सोहळ्यासाठी नागपूरचे शेफ, विष्णू मनोहर (Chef Vishnu Manohar) 7000 किलो 'राम हलवा' (Ram Halwa) तयार करणार आहेत. विष्णू मनोहर यांनी 12 हजार लिटर क्षमतेची खास कढई बनवली असून त्यात ते राममंदिर परिसरात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राम हलवा तयार करणार आहेत.
राम हलव्यासाठी 1000 किलो तूप तर 300 किलो सुका मेवा -
शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितले की, या कढईचे वजन 1300 ते 1400 किलो आहे. ही कढई स्टीलची असून तिचा मध्यवर्ती भाग लोखंडाचा बनलेला आहे. जेणेकरून हलवा बनवताना तो जळू नये. या कढईचा आकार 10 फूट बाय 10 आहे. याची क्षमता 12,000 लीटर असून, त्यात 7,000 किलो हलवा बनवता येतो. तो उचलण्यासाठी क्रेनची आवश्यकता असते. 900 किलो रवा, 1000 किलो तूप, 1000 किलो साखर, 2000 लिटर दूध, 2500 लिटर पाणी, 300 किलो सुका मेवा आणि 75 किलो वेलची पावडर वापरून हा हलवा तयार केला जाणार आहे. (हेही वाचा - Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठासाठी '22 जानेवारी' हा दिवस का निवडण्यात आला? काय आहे यामागचं खास कारण? जाणून घ्या)
'कार सेवा ते पाक सेवा' -
राम लल्लाला अर्पण केल्यानंतर हा प्रसाद सुमारे दीड लाख लोकांना वाटला जाणार आहे. विष्णू मनोहर यांनी सांगितले की, आम्ही या उपक्रमाला 'कार सेवा ते पाक सेवा' असे नाव दिले आहे. त्याच्याशी आमच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. आंदोलनादरम्यानची अयोध्या आणि आजची अयोध्या यात खूप फरक आहे. आज अयोध्येत खूप जल्लोष आहे.
विष्णू मनोहर यांचा रामजन्मभूमी आंदोलनाशी संबंध आहे. त्यांनी अयोध्येत कारसेवा केली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून रामजन्मभूमी ट्रस्टच्या नावावर विश्वविक्रमही होणार आहे. राम मंदिर अभिषेक सोहळ्याला पंतप्रधान मोदी आणि इतर अनेक व्हीव्हीआयपी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा -Ayodhya Land Dispute Case मध्ये बाबरी मस्जिद चे मुख्य पक्षकार Iqbal Ansari यांनाही मिळालं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण (Watch Video))
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी रोजी राम मंदिरातील अभिषेक समारंभास उपस्थित राहणार आहेत. अयोध्येतील शुभ सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारत आणि परदेशातील अनेक व्हीव्हीआयपी पाहुण्यांना आमंत्रणे मिळाल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.