ब्राह्मोसच्या शास्त्रज्ञाला अटक; पाकिस्तानला पुरवत होता देशाच्या सुरक्षिततेची माहिती
देशाची सुरक्षितता धोक्यात आणून, देशाशी गद्दारी करणारा डीआरडीओचा इंजिनीअर निशांत अग्रवाल याला अटक करण्यात आली आहे.
देशाची सुरक्षितता धोक्यात आणून, देशाशी गद्दारी करणारा डीआरडीओचा इंजिनीअर निशांत अग्रवाल याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश एटीएस आणि लष्कराने ही कारवाई केली. निशांत भारताच्या सुरक्षेची ताकद असलेल्या ब्राह्मोस मिसाईलशी संबधित माहिती पाकिस्तान आणि अमेरिकेला देत असल्याचा आरोप त्याच्यावर केला गेला आहे.
नागपूरपासून जवळ मोहगावमध्ये भारत आणि रशियाच्या संयुक्त तंत्रज्ञानावर आधारित डीआरडीओचा ब्राह्मोस मिसाईल्सचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात चार वर्षांपासून उत्तराखंडचा निशांत अग्रवाल सिस्टम इंजिनिअर म्हणून काम करत आहे. या प्रकल्पाची माहिती तो पाकिस्तानच्या आयएसआयला पाठवत असल्याचा संशय तपास यंत्रणेला आला. यावरूनच एटीएसने ही कारवाई केली. निशांत हा मॅकेनिकल इंजिनीअर असून तो डीआरडीओमध्ये 2012 पासून शास्त्रज्ञ पदावर कार्यरत होता. निशांत डीआरडीओच्या ब्राम्होस युनिटमध्ये कार्यरत असल्याने रिसर्च विंगची बरीच गुप्त माहिती त्याच्याकडे होती.
ब्राह्मोस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त संशोधनातून तयार झालेले मिसाईल आहे. कमी अंतरापर्यंत वार करणारं हे मिसाईल, जमीन, विमान, जहाज आणि पाणबुडीत वापरले जाते. हवेतच मार्ग बदलणे आणि चालत्या लक्ष्यालाही उद्ध्वस्त करण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे. ब्राह्मोसला पकडणं किंवा उद्ध्वस्त करणं कठीणच नव्हे अशक्मय आहे. ब्राह्मोस मिसाईल अमेरिकन टॉमहॉक मिसाईलच्या दुप्पट वेगाने वार करते. इतक्या महत्त्वपूर्ण मिसाईल संदर्भातील गोपनीय माहिती निशांत पाकिस्तान व अमेरिकेला पुरवत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
इंग्रजी दैनिक इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, निशांत अग्रवाल हा अमेरिकेतील गुप्तचर संघटना सीआयएच्या एका महिला एजंटच्या जाळ्यात अडकला होता. हनी ट्रॅपमध्ये निशांत अडकला गेला. ही महिला कोण होती आणि ती निशांतच्या संपर्कात कशी आली याची माहिती मिळू शकली नाही. आरोपी निशांत हा सोशल मीडियाद्वारे ब्रह्मोस मिसाईलबद्दल माहिती पुरवत होता. त्यासाठी त्याने इन्क्रिप्टेड, कोडवर्ड आणि खेळाचे चॅट कोर्ड वापरत होता.