भाजप खासदार गौतम गंभीर यांना परदेशातून जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडे केली सुरक्षा वाढवण्याची मागणी
त्यामुळे गौतम यांनी पोलिसांकडे आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची मागणी केली आहे.
भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांना परदेशातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे गौतम यांनी पोलिसांकडे आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची मागणी केली आहे. गौतम यांनी शहादारा जिल्हयातील पोलिस अधिक्षक यांना याबाबत पत्रही लिहिले आहे. 'मला आणि माझ्या परिवाराला परेदशातील एका क्रमांकावरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याबाबत मी तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे माझी सुरक्षा वाढवण्यात यावी,' अशी मागणी गौतम गंभीर यांनी पक्षाद्वारे केली आहे.
गौतम गंभीर हे नेहमी आपल्या वादग्रस्त विधानामुळे तसेच वादग्रस्त ट्वीचमुळे चर्चेत असतात. गंभीर यांनी क्रिकेटमधून विश्रांती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. त्यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. मागील महिन्यात दिल्लीमध्ये आयटीओ परिसरातील झाडे आणि भिंतीवर गौतम गंभीर बेपत्ता झाल्याचे पोस्टर लावण्यात आले होते. त्यावर तुम्ही गौतम गंभीर यांना कुठे पाहिले आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. (हेही वाचा - लोकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात कोर्टाने दिले गौतम गंभीरच्या अटकेचे आदेश)
दरम्यान, दिल्लीत प्रदुषणाबाबत बोलावण्यात आलेल्या बैठकीला गौतम गंभीर उपस्थित राहिले नाहीत. तेव्हा ते इंदौर येथे सुरु असलेल्या क्रिकेटच्या सामन्यासाठी कॉमेन्ट्री करण्यासाठी गेले होते. तेव्हा गौतम गंभीर यांचा माजी क्रिकेटर लक्ष्मण यांच्यासोबत जिलेबी खातानाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे आम आदमी पक्षाने गौतम गंभीर यांच्यावर टीका केली. तसेच ज्यावेळी प्रदुषाचा मुद्दा उपस्थित केला जातो, त्यावेळी गौतम गंभीर पुढे असतात. पंरतु, जेव्हा प्रदुषण नियंत्रणाबाबतचा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा ते अनुपस्थिती असतात, असं म्हटलं होतं.