अनिल अंबानी यांच्यावर कर्जाचा डोंगर; सर्व कंपन्या, प्रकल्प आणि ऑफिस विकून करणार परतफेड

यासाठी त्यांनी अनेक कंपन्यांची भागीदारी, मालमत्ता इ. विक्री करून आपले कर्ज चुकवण्याचा सपाटा लावला आहे.

Anil Ambani| (Photo Credits: PTI/File)

अनिल अंबानी (Anil Ambani) यांनी आपल्या समूहाच्या संपूर्ण कर्जाची परतफेड करून नव्याने सुरुवात करायचा विचार केला आहे. यासाठी त्यांनी अनेक कंपन्यांची भागीदारी, मालमत्ता इ. विक्री करून आपले कर्ज चुकवण्याचा सपाटा लावला आहे. अनिल अंबानी समूहाची कंपनी रिलायंस इन्फ्रास्ट्रक्चर (Reliance Infrastructure) ने म्हटले आहे की, यासाठी कर्ज देणाऱ्या सर्व 16 बँक-संस्थाशी एक करार केला आहे. अनिल अंबानी यांनी मागील महिन्यात सांगितले होते की, त्यांच्या समूहाने मागील 14 महिन्यांत सर्व मालमत्ता विकून जवळजवळ 35000 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. पण अजूनही या समूहावर जवळजवळ 93900 कोटी रुपये कर्ज आहे.

रिलायंस इन्फ्रा 2020 पर्यंत पूर्णपणे कर्ज मुक्त होऊ इच्छित आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीमध्ये कंपनीने म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेच्या 7 जून 2019 च्या सर्कुलरनुसार, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने कर्ज फेडण्यासाठी आपल्या 100 टक्के कर्जदारांकडून आयसीए केली आहे. ब्लूमबर्गनुसार, समूहावर एकूण 93900 कोटी रुपये कर्ज आहे. रिलायंस नवल अँड इंजीनियरिंगवर 7000 कोटी रुपये कर्ज आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरवर जवळपास 17800 कोटी रुपये कर्ज आहे. रिलायंस कॅपिटल वर 38900 कोटी रुपये कर्ज आहे, तर रिलायन्स पॉवर वर 30200 कोटी रुपये कर्ज आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ला कर्ज फेडण्याची योजना 180 दिवसांच्या आत लागू करणे आवश्यक आहे. त्यासाठी दिल्ली-आगरा टोल रोड व्यवसायाची 3,600 कोटी रुपयांना विक्री केली जाईल. एकूण नऊ रोड प्रोजेक्ट्सच्या व्यवसायाची विक्री करून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर एकूण 9,000 कोटी रुपये उभा करू शकेल. (हेही वाचा: कर्जबाजारी झालेल्या अनिल अंबानी यांनी विकायला काढले BIG FM; तब्बल 1200 कोटींना ठरला व्यवहार)

अनिल अंबानी समूह आपल्या तीन विशाल मुख्यालयांचीही विक्री करणार आहे. यात मुंबईच्या उपनगरीय परिसरात स्थित रिलायंस सेंटर देखील समाविष्ट आहे. अंदाजानुसार साऊथ मुंबईचे बलार्ड इस्टेट ऑफिस आणि सांताक्रुज येथील 70 हजार वर्ग फुटचे रिलायन्स सेंटर विकून समूहाला 1500 ते 2000 कोटी रुपये प्राप्त होऊ शकतात. रिलायन्स कॅपिटल कंपनी रिलायंस जनरल इंश्योरेंसची 100 टक्के हिस्सेदारी विकली तर 5000 कोटी रुपये मिळू शकतील.

याच समूहाची कंपनी रिलायन्स निप्पॉन लाइफ अॅसेट मॅनेजमेंटची विक्री 4500 कोटी रुपयांना होऊ शकेल, तर प्राइम फोकसच्या विक्रीतून 1000 कोटी रुपये मिळतील. रिलायन्स कॅपिटलच्या प्रायव्हेट इक्विटी आणि रियल इस्टेट विक्रीतून 1000 कोटी रुपये उभे केले जाऊ शकतात. अनिल अंबानी यांनी आपल्या मालकीचे रेडीओ क्षेत्रात दबदबा असणारे बिग एफएम (BIG FM) विकायला काढले आहे. यासाठी तब्बल 1200 कोटींची त्यांना अपेक्षा आहे.