Assam EVM Case: भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्यानंतर निवडणूक आयोगाकडून मोठी कारवाई; 4 अधिकारी निलंबित, संबंधित बूथवर पुन्हा होणार मतदान
त्यानंतर यावरून हिंसाचार घडल्याचंही पाहायला मिळालं होतं.
Assam EVM Case: आसाममधील दुसर्या चरणातील मतदानानंतर, भाजपा नेत्याच्या गाडीत ईव्हीएम सापडल्यानंतर निवडणूक आयोगाने 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले. यात एका पीठासीन अधिकाऱ्याचाही समावेश आहे. गुरुवारी मतदानानंतर करीमगंज जिल्ह्यात भाजप उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम मशीन नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर यावरून हिंसाचार घडल्याचंही पाहायला मिळालं होतं. कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही अनेक ट्वीट करून निवडणूक आयोगाकडे या प्रकरणी निर्णायक कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, माध्यमांच्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाच्या कारमधील बिघाडामुळे पोलिंग एजंट्सनी भाजप नेत्याच्या कारमधून लिफ्ट घेतली.
चौकशीत सर्व ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित सापडल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्याचा सील तोडलेला नाही. आयोगाने नमूद केले की, ईव्हीएमसह बीयू, सीयू आणि व्हीव्हीपॅट हे सुरक्षित कक्षात जमा करण्यात आले होते. परंतु, खबरदारी म्हणून पोलिंग स्टेशन रताबारी विधानसभा सीटचे इंदिरा एम.व्ही शाळेच्या मतदान केंद्राच्या 149 क्रमांकावर पुन्हा मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय या संपूर्ण प्रकरणाबाबत विशेष पर्यवेक्षकाकडून अहवालही मागविण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी गुवाहाटीतील एका पत्रकाराने भाजप नेत्यांच्या कारमध्ये ईव्हीएम सापडल्याचा व्हिडिओ ट्विट केला. कारमध्ये ईव्हीएम सापडल्यावर मोटारीला जमावाने घेरले होते. (वाचा - Assam: भाजप उमेदवाराच्या गाडीत सापडले EVM मशीन; काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी निवडणूक आरोगाकडे केली कारवाईची मागणी)
मीडिया रिपोर्टनुसार, करीमगंज जिल्ह्यातील रताबारी विधानसभा मतदारसंघातील मतदानानंतर पोलिंग टीम ईव्हीएम घेऊन जात असताना कार खराब झाली. मतदान पथक स्ट्रॉंग रूमकडे जात होते. कार खराब झाल्यानंतर पथकाने निवडणूक आयोगाकडे आणखी एका कारची मागणी केली. मतदान अधिकाऱ्यांना दुसर्या कारची व्यवस्था करण्यास सांगितले गेले होते. परंतु तोपर्यंत त्यांनी भाजप नेत्याच्या कारमधून लिफ्ट घेतली.