Uttarkhand Accident: पूजेसाठी गंगाजल आणण्यासाठी गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला, कार दरीत कोसळल्याने जागीच 4 जणांचा मृत्यू
उत्तराखंडच्या बागेश्वर परिसरात देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचा कारचा अपघात झाला आहे.
Uttarkhand Accident: देवदर्शनासाठी आलेल्या तरुणांवर काळाने घाला घातला आहे. उत्तराखंडच्या बागेश्वर परिसरात देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचा कारचा अपघात झाला आहे. कार अनियंत्रित झाल्याने थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरित जाऊन कोसळली आहे.या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी 14 एप्रिलच्या पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली आहे. (हेही वाचा- सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद
मिळालेल्या माहितीनुसार, चार ही मृत तरुण एकाच गावातील रहिवासी होते. गावात पूजा होती त्यानिमित्ताने सरयू नदीतून गंगाजल आणण्यासाठी कारने उत्तराखंड येथील बागेश्वर येथे जात होते. कारने बालीघाट धरमघर परिसरातील चिरांगजवळ आली असता, अचानक कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित कार थेट खोल दरीत जाऊन कोसळली. यात कारचा चक्काचूर झाला.
अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान देखील हजर झाले. त्यांनी बचाव कार्य सुरु करत चार मृतदेह बाहेर काढले आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवले. कमल प्रसाद , नीरज कुमार, दीपक आर्य, कैलाश राम अशी मृत तरुणांची नावे आहेत. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन सख्खे भांवड होते.