Gang Rape Jaipur: चालत्या बसमध्ये तरुणीवर चालकांकडून सामुहिक बलात्कार, एकाला अटक, दुसरा फरार
कानपूरहून जयपूरला जात असताना ९ आणि १० डिसेंबरच्या मध्यरात्री दोन चालकांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.
Gang Rape Jaipur: 2012 रोजी दिल्लीत निर्भया प्रकरणामुळे संपुर्ण देश हादरला होता. तसंच काहीसं जयपूरला जाणाऱ्या बसमध्ये घडलं. चालत्या बसमध्ये तरुणीवर चालकांकडून सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादाक माहिती समोर आली आहे. कानपूरहून जयपूरला जात असताना ९ आणि १० डिसेंबरच्या मध्यरात्री दोन चालकांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. बसमध्ये जागा न मिळाल्याने तिला केबिनमध्ये बसवण्यात आले. तेव्हा वेळ प्रसंग पाहून दोघांनी मुलीवर बलात्कार केला. (हेही वाचा- सामुहिक बलात्काराच्या घटनेनं मुंबई पुन्हा हादरली;)
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान केबिनमध्ये इतर प्रवाशी निघून गेल्यावर दोन्ही चालकांनी तिच्यावर बलात्कार केला. तरुणी जयपूरला मामाच्या घरी जात होती. संध्याकाळी ७.३०च्या सुमारास ती बसममध्ये चढली. बाहेर बसलेल्या प्रवाशांना संशय आल्याने त्यांनी केबिनचा दरवाजा उघडला. तरुणीची अवस्था पाहून प्रवाशांनी चालकांना मारहाण केली. त्यातील एक चालक पळून गेला. प्रवाशांनी दुसऱ्या चालकाला पकडून मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलीने या घटनेची माहिती प्रवाशांना दिली. प्रवाशांनी मुलीला आणि चालकाला पोलिस ठाण्यात नेलं. मुलीच्या काकांना तक्रार देण्यासाठी बोलवण्यात आले. काकांनी आणि मुलीने तक्रार नोंदवली.
मोहम्मद आरिप असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ललित फरार असल्याने त्याचा शोध सुरु आहे. बस्सी येथील पोलिस ठाण्यातील एसीपी या घटनेची चौकशी करत आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. एसीपी फुलचंद मीना यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की दुसऱ्या आरोपीला लवकरच पकडण्यात येईल.