Sugar Exports Extended in India: महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल; साखर निर्यातीवरील बंदी एक वर्षासाठी वाढवली
यापूर्वी सरकारने ही बंदी यावर्षी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत लागू केली होती.
Sugar Exports Extended in India: महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने पावले उचलली जात आहेत. या दिशेने आज सरकारने साखरेच्या निर्यातीवरील (Sugar Export) बंदी पुढील वर्षी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरात खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे महागाई झपाट्याने वाढत असताना केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सरकारने ही बंदी यावर्षी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत लागू केली होती.
परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, पुढील आदेश येईपर्यंत साखरेच्या निर्यातीवर (कच्ची, शुद्ध आणि पांढरी साखर) बंदी 31 ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. (हेही वाचा - MP Shocking: हातात सल्फासच्या गोळ्या, चेहऱ्यावर हास्य; 3 विद्यार्थीनींनी आत्महत्या करण्यापूर्वी शूट केला व्हिडिओ)
दरम्यान, सरकारने साखरेच्या निर्यातीवर घातलेली ही बंदी युरोपियन युनियन आणि अमेरिकेत CXL आणि TRQ कोटा अंतर्गत साखरेच्या निर्यातीवर लागू होणार नाही. या अंतर्गत या देशांना साखरेची निर्यात पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. सध्या भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. त्याचबरोबर यंदा साखर निर्यातीच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महागाई कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील -
महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत. यापूर्वी केंद्र सरकारनेही गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्याचबरोबर महागाई नियंत्रणात आणण्यासाठी RBI व्याजदरात सातत्याने वाढ करत आहे. गेल्या पाच महिन्यांत आरबीआयने रेपो दरात 1.95 टक्क्यांनी वाढ केली आहे.