खुशखबर! रेल्वेमध्ये तब्बल 9 हजार पदांची नोकर भरती, महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव

पियुष गोयल यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

Representational Image | (Photo Credits: PTI)

रेल्वे मंत्री पीयुष गोयल (Piyush Goyal) यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाआधी काही दिवस एक महत्वाची घोषणा केली आहे. देशातील महिलांसाठी ही घोषणा खुशखबर ठरत आहे. आता रेल्वेमध्ये येत्या काही दिवसांत जी नोकर भरती (Railway Recruitment) केली जाईल, त्यामध्ये 50 टक्के जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. पियुष गोयल यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. सध्या आरपीएफ (RPF) मध्ये केवळ 2.25 टक्के महिला आहेत. ही गोष्ट लक्षात घेत महिलांना नोकरी देत त्यांची संख्या वाढवावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचित केले होते.

आता रेल्वेमध्ये काॅन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर पदांची भरती होणार आहे. यामध्ये तब्बल 9 हजार लोकांना नोकरी देण्यात येणार आहे. या भरतीमध्ये आता 50 टक्के म्हणजेच 4500 जागांवर फक्त स्त्रियांना घेण्यात येणार आहे. ही भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे.

(हेही वाचा: रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; रेल्वेमध्ये 4 लाख जागांसाठी होणार भरती)

दरम्यान, जानेवारी 2019 मध्ये, भारतीय रेल्वेने 2021 पर्यंत 10 टक्के आरक्षण अंतर्गत, 4 लाख पदांची भरती करण्यत येणार असल्याचे घोषणा केली होती. गेल्या वर्षात रेल्वेत दीड लाख लोकांना नोकरी देण्यात आली. येत्या दोन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागा आणि इतर जागा अशा मिळून 4 लाख लोकांना रेल्वेत काम मिळणार आहे.