Rajasthan: जोधपूरमध्ये टूरिस्ट बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक; भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू

या अपघाताची माहिती मिळताचं नागरिकांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. तसेच जखमी प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

Accident Representational image (PC - PTI)

Rajasthan: राजस्थानच्या जोधपूर (Jodhpur) येथे शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात (Accident) 5 जणांचा मृत्यू झाला. जोधपूरच्या फलोदी येथे हा अपघात झाला. मिनी टूरिस्ट बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत पाच लोकांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. यामध्ये 6 मुलांचा समावेश आहे. मृत्यू पावलेले सर्वजण दिल्लीचे आहेत. या अपघाताची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोधपूर जिल्ह्यातील बाप भागात आज सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात दोन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी 6 मुलांसह 12 जण जखमी झाले. पोलिस अधिकारी हरीसिंग राजपुरोहित यांनी सांगितले की, पर्यटक दिल्लीहून एका मिनी बसमध्ये जैसलमेरला जात होते. आज सकाळी फलोदीच्या बाप पोलिस स्टेशन परिसरातील एनएच -11 वर गाडना गावाजवळील बस एका ट्रकला धडकली. (वाचा - गुरगाव येथील वाटिका सिटी मध्ये झाडाखाली उभ्या असलेल्या 4 कर्मचाऱ्यांवर वीज कोसळली, 2 जण गंभीर जखमी (Watch Video))

मिनी बस आणि ट्रक यांच्यातील टक्कर इतकी जोरदार होती की, यात मिनी बस उडून पलटी झाली. या अपघाताची माहिती मिळताचं नागरिकांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. तसेच जखमी प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

सध्या जखमींवर फलौदी व बीकानेर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मिनी बस किंवा ट्रकमधील चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.