Uttarkashi Tunnel Collapse Rescue Update: उत्तरकाशीत बोगद्यात अडकले 41 जीव, Vertical Drilling सह 'या' 5 पर्यायांमुळे बचावकार्य होणार सोप

कामगारांना बाहेर काढण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्यासाठी रविवारी बोगद्याच्या माथ्यावरून उभ्या खोदकामाला सुरुवात करण्यात आली आणि पहिल्या दिवशी सुमारे 20 मीटर खोदकाम करण्यात आले. पाच पर्यायांपैकी हा एक पर्याय आहे ज्याद्वारे कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल.

Uttarkashi Tunnel Collapse | Photo Credits: X)

Uttarkashi Tunnel Collapse Rescue Update: उत्तराखंडच्या उत्तरकाशी (Uttarkashi) येथील सिल्कियारा-बरकोट बोगदा (Silkyara-Barkot Tunnel) 12 नोव्हेंबर रोजी कोसळल्यानंतर दोन आठवड्यांहून अधिक काळ अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्याच्या प्रयत्नात बचाव पथकांनी वेग घेतला आहे. कामगारांना बोगद्याच्या बाहेर काढण्यासाठी Vertical Drilling सह 5 इतर पर्यायांचा वापर करण्यात येत आहे. रविवारी बचावकर्त्यांनी बोगद्याच्या वरच्या टेकडीवर उभ्या ड्रिलिंग करण्यास सुरुवात केली. अनेक सरकारी एजन्सींच्या व्यतिरिक्त, प्रगत ऑगर ड्रिलिंग मशीन खराब झाल्यानंतर भारतीय सैन्याने बोगदा हाताने खोदणे सुरू केले. अडकलेली मशीन आता बोगद्यातून काढण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने उत्तरकाशीमध्ये यलो इशारा जारी केला असून पाऊस, विजांचा कडकडाट आणि संभाव्य गारपिटीचा इशारा दिला आहे. यामुळे पुन्हा बचाव कार्यावर परिणाम होऊ शकतो.

सिल्कियारा-बरकोट बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेचा आज 16 वा दिवस आहे. कामगारांना बाहेर काढण्यासाठी एकूण पाच योजनांवर काम केले जात आहे. कामगारांना बाहेर काढण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्यासाठी रविवारी बोगद्याच्या माथ्यावरून उभ्या खोदकामाला सुरुवात करण्यात आली आणि पहिल्या दिवशी सुमारे 20 मीटर खोदकाम करण्यात आले. पाच पर्यायांपैकी हा एक पर्याय आहे ज्याद्वारे कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल. आता भारतीय लष्करही बचाव कार्यात सहभागी झाले आहे. अशातच आता या पाच पर्यायांबद्दल जाणून घेऊया, ज्याद्वारे कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्याची तयारी केली जात आहे. (हेही वाचा - Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशीत व्हर्टिकल ड्रिलिंगचे काम सुरू, प्लाझ्मा कटरमधून काढण्यात येत आहेत मशीनचे अडकलेले तुकडे, Watch Video)

बोगद्यात जाण्यासाठी उभा रस्ता तयार करण्यासाठी, 86 मीटरपर्यंत ड्रिलिंग केले जाईल जेणेकरून कामगार पोहोचू शकतील. रविवारी सायंकाळपर्यंत 19.5 मीटर खोदकाम करण्यात आले. नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NHIDCL) चे व्यवस्थापकीय संचालक महमूद अहमद यांनी सांगितले की, कोणतीही अडचण न आल्यास गुरुवारपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंगचे काम पूर्ण केले जाईल. एस्केप पॅसेज तयार करण्यासाठी, 700 मिमी पाईप्स ड्रिल केले जात आहेत आणि ढिगाऱ्याच्या आत टाकले जात आहेत. यापासून काही अंतरावर 70 मीटरपर्यंत पातळ 200 मिमी व्यासाचे पाईप टाकले जात आहेत.

कामगारांना बाहेर काढण्याचा आणखी एक संभाव्य मार्ग म्हणजे बाजूने ड्रिलिंग करणे. मात्र, त्यासाठी लागणारी मशिनरी अद्याप घटनास्थळी पोहोचलेली नाही. एनडीएमएचे सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांनी सांगितले की, रविवारी रात्रीपर्यंत मशीन्स बोगदा अपघाताच्या ठिकाणी पोहोचणार होत्या. त्यांच्याद्वारेच कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी 17 मीटरचा मार्ग मोकळा करावा लागला.

बोगद्याच्या बारकोट टोकापासून ब्लास्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करून 483 मीटर लांबीचा बचाव बोगदा तयार करण्याच्या योजनेवरही काम सुरू आहे. रविवारी सकाळपर्यंत 10-12 मीटर परिसरात पाच स्फोट झाले होते. बचाव कार्याला गती देण्यासाठी दिवसाला तीन स्फोट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे हसनैन यांनी सांगितले. दरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितले की अडकलेल्या कामगारांसाठी बोगद्यात प्रकाश, ऑक्सिजन, अन्न, पाणी आणि औषधे उपलब्ध आहेत. तत्पूर्वी, ऑगर ड्रिलिंग मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे बचावकार्य थांबल्यानंतर तणाव कमी करण्यासाठी त्यांना मोबाईल फोन आणि बोर्ड गेम प्रदान करण्यात आले होते.