छत्तीसगढः नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफच्या CoBRA बटालियनचे 2 जवान शहीद; 4 जखमी
या चकमकीत सीआरपीएफ जवानांना एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात यश आलं आहे.
छत्तीसगढमधील (Chhattisgarh) बस्तर येथे नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा (CoBRA) बटालियनचे 2 जवान शहीद झाले असून 4 जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत सीआरपीएफ जवानांना एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात यश आलं आहे.
बस्तर विभागातील विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील इरापल्ली गावात सोमवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास चकमक सुरू झाली. यात एक नक्षलवादी मारला गेला. सीआरपीएफ जवानांनी या नक्षलवाद्याची शस्त्रास्त्रेही जप्त केली आहेत, असं सीआरपीएफच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले आहे. (हेही वाचा - केंद्र सरकार Air India, LIC नंतर अजून एका सरकारी कंपनीमधील भागीदारी विकणार; उभे करणार 1 हजार कोटी)
दरम्यान, या चकमकीत सीआरपीएफच्या स्पेशल यूनिट कमांडो बटालियन फॉर रिलोल्यूट ऍक्शनचे (कोब्रा) 2 जवान शहीद झाले आहेत. तसेच जखमी झालेल्या 4 जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 2008 मध्ये नक्षलवाद्यांविरोधातील ऑपरेशनसाठी सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनची स्थापना करण्यात आली होती.