जम्मू-श्रीनगर महामार्गावर चकमक; 3 दहशतवाद्यांचा खात्मा
या चकमकीत भारतीय जवानांना 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे.
जम्मू-श्रीनगर महामार्गावर (Jammu-Srinagar Highway) नगरोटा येथील बान टोल प्लाझाजवळ आज पहाटे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) चकमक उडाली. या चकमकीत भारतीय जवानांना 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे.
भारतीय जवानांनी जम्मू-श्रीनगर महामार्गावर असलेल्या बान टोल प्लाझा येथे संशयित ट्रक अडवला. या ट्रकमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात 1 जवान जखमी झाला असून 3 दहशतवादी ठार झाले आहेत. चकमकीदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूक काही काळावधीसाठी थांबवण्यात आली होती. (हेही वाचा - भारतीय तरुणाने 3 वेळा नाकारली NASA ची ऑफर, डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलाहूनही नाही गेला अमेरिकेला, म्हणाला 'देशात राहून संशोधन करेन')
पोलिस महानिरीक्षक मुकेश सिंग यांनी चकमकीसंदर्भात माहिती देताना सांगितले की, 'आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी तपासणी करण्यासाठी ट्रक थांबवला. या ट्रकमध्ये दहशतवादी लपले होते. पोलिसांनी ट्रक अडवल्यानंतर या दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. या चकमकीत 1 पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. पोलिसांनी दहशतवाद्यांवर गोळीबारास सुरुवात केली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाली. तसेच अन्य दहशतवादी आसपासच्या परिसरात लपून बसले होते. या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं, असंही मुकेश सिंग यांनी सांगितलं.