Kiran Mane प्रकरणात गुळुंब ग्रामस्थांचा स्टार प्रवाह विरोधात ठराव; ‘मुलगी झाली हो’ मालिकेचे शूटिंग थांबवण्याचा निर्णय

#istandwith_KiranMane हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. किरण माने यांच्यावर झालेली कारवाई चुकीची असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

Mulgi Jhali Ho (संग्रहित संपादित प्रतिमा)

किरण माने (Kiran Mane) प्रकरणात गुळुंब (Gulumb) ग्रामस्थांनी स्टार प्रवाह (Star Pravah) विरोधात ग्रामपंचायत ठराव पास केला आहे. गावकऱ्यांनी गावात सुरु असलेले ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Jhali Ho) या मालिकेचे शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. स्टार प्रवाहच्या 'मुलगी झाली हो' या मराठी मालिकेमध्ये विलास पाटील नावाची भूमिका साकारणारे अभिनेता किरण माने अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाले आहेत. किरण माने हे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, यावेळी किरण माने यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत मांडणे चांगलेच महागात पडले आहे.

नुकतेच आपण एक ठराविक राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला 'मुलगी झाली हो'मधून काढण्यात आले असल्याचे किरण माने यांनी सांगितले आहे. त्यानंतर गेले दोन दिवस स्टार प्रवास या वाहिनीविरुद्ध सोशल मिडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांनीही वाहिनीच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. किरण माने यांच्यावर वाहिनीने केलेल्या कारवाईनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी अनेक चाहत्यांनी उघडपणे किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे.

अनेकांनी वाहिनीच्या या कारवाईला सांस्कृतिक दहशतवाद म्हटले आहे. #istandwith_KiranMane हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. किरण माने यांच्यावर झालेली कारवाई चुकीची असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. दुसरीकडे, 'मुलगी झाली हो' या मालिकेचे सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील गुळुंब गावात चित्रिकरण सुरु आहे. परंतु आता किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर गुळुंब ग्रामपंचायतीने एक ठरवा पास करत, मालिकेच्या चित्रिकरणास परवानगी नाकारली आहे. गुळुंब गावाच्या सरपंच स्वाती शिवाजी माने यांनी याबाबतचे एक पत्र 'स्टार प्रवाह' वाहिनी आणि 'मुलगी झाली हो' मालिकेच्या टीमला पाठवले आहे.

आपल्या पत्रात सरपंच म्हणतात, ‘राजकीय भूमिका मांडणाऱ्या मराठी कलावंताला मालिकेतून काढल्याबद्दल मराठी चित्रपटसृष्टीचा जाहीर निषेध! अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनी आणि ‘मुलगी झाली हो’ या मालिकेची संपूर्ण टीमने हे विसरु नये की, महाराष्ट्रात अजनूही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर लोकशाही नांदते. अशा मनुवादी विचारसरणीच्या स्टार प्रवाह वाहिनी आणि ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या टीमचे आमच्या गावी होत असलेल्या चित्रीकरणाला ग्रामपंचाय गुळुंब तालुका वाई जिल्हा सातारा मान्यता नाकारत आहे. अशा प्रवृत्तीला इथून पुढे आमच्या हद्दीत प्रवेश नाही’.

Tags