अशोक सराफ, प्रिया तेंडुलकर यांची धमाल कॉमेडी 'हम पांच' मालिका झी टीव्हीवर पुन्हा झळकणार
पाच मुली आणि त्यांच्या वडिलांभोवती फिरणारी विनोदी मालिका 'हम पांच' 1995 ते 99 च्या काळात खूपच प्रसिद्ध होती. . हम पांच मध्ये प्रिया तेंडुलकर, अशोक सराफ हे मराठमोळे चेहरे झळकले होते
हिंदी मालिकांमध्ये वर्चस्व गाजवणार्या एकता कपूरने 1995 साली टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. एकता कपूरच्या (Ekta Kapoor) अनेक मालिकांनी लोकप्रियतेची शिखरं पाहिली पण अनेकांच्या मनात आजही निखळ हसवू शकणारी मालिका हम पांच (Hum Paanch) अनेकांची पहिली पसंत असेल. पाच मुली आणि त्यांच्या वडिलांभोवती फिरणारी विनोदी मालिका 'हम पांच' 1995 ते 99 च्या काळात खूपच प्रसिद्ध होती. पाच वेगवेगळ्या तर्हेच्या मुली आणि त्यांची वडिलांसोबत असणारी केमेस्ट्री 2005 साली ' हम पांच फिर से' या नव्या शीर्षकासह वर्षभर चालवण्यात आली होती. पण आता कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देशात लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे ही वेळ साधत आता आबालवृद्धांसाठी झी टीव्ही 'हम पांच' चं पुन्हा प्रक्षेपण सुरू करण्याच्या विचारात आहे.
काही दिवसांपूर्वी डीडी वर रामायण, महाभारत, शक्तिमान ते अगदी चाणाक्य, श्रीमान श्रीमती पुन्हा सुरू करण्यात आलं. यामध्ये रामायण मालिकेच्या पुन:प्रसारणाने टेलिव्हिजन जगतात पुन्हा रेकॉर्डब्रेक टीआरपीची कामगिरी केली आहे. त्यामुळे आता खाजगी वाहिनी झी टीव्ही देखील पुन्हा जुन्या मालिकांपैकी हम पांच लोकांसमोर घेऊन येत आहे.
हम पांच मालिकेचे पुन्हा प्रसारण कधी पासून सुरू होणार?
हम पांच मालिका 13 एप्रिल 2020 पासून दुपारी 12 वाजता पुन्हा दाखवली जाणार आहे. तर Dance India Dance 2 12 एप्रिल 2020 पासून रविवारी दुपारी 12 वाजता दाखवला जाणार आहे.
दरम्यान मार्च महिन्यातच 'हम पांच' मालिकेने 25 वर्ष पूर्ण केली आहेत. हम पांच मध्ये प्रिया तेंडुलकर, अशोक सराफ हे मराठमोळे चेहरे झळकले होते. विनोदाचे सम्राट समजल्या जाणार्या अशोक सराफ यांच्या कारकीर्दीतील हम पांच ही मालिका माईलस्टोनपैकी एक आहे. दरम्यान झी टीव्हीवर आता हम पांच सोबतच डांस इंडिया डांस, कबुल है, सा रे ग म प लिटील चॅम्प्स आणि झी फाईव्हच्या काही वेब सीरीजदेखील दाखवल्या जाणार आहेत.